पाकिस्तानच्या न्यायालयाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची पनामा प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या तीन प्रकरणांना एकत्र करण्याची याचिका भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या निर्णयाला पाकिस्तानच्या इतिहासातील हा ‘काळा शब्द’ असल्याची टीका शरीफ यांनी केली आहे.
भ्रष्टाचार केल्याप्रकरणी नॅबने शरीफ, त्यांचा मुलगा आणि जावई यांच्याविरोधात ८ सप्टेंबरला तीन गुन्हे दाखल केले आहेत. शरीफ कुटुंबीय आणि अर्थमंत्री इशाक डार यांनी न्यायालयाने २८ जुलैला दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले होते.
पनामा प्रकरणामध्ये न्यायालयाने शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार केले होते. सध्या शरीफ यांच्यावर तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांची सुनावणी सुरू आहे. शरीफ यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्हय़ांबाबत न्यायालयात बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले.
दाखल करण्यात आलेल्या गुन्हय़ांमध्ये मी दोषी नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा खटला ६ महिन्यांत निकाली काढावा अशी मागणी शरीफ यांनी केली होती. शरीफ यांची ही पुनर्विचार याचिका न्यायधीश मोहम्मद बशीर यांनी फेटाळली असून, शरीफ यांना या प्रकरणामध्ये कायद्यानुसार योग्य न्याय देण्यात येईल. त्यामुळे या याचिकेवरील पुढील सुनावणी १५ नोव्हेंबपर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याचे न्यायालयाने सांगितले.
याचिका फेटाळल्यानंतर न्यायालयाने दिलेला निर्णय पाकिस्तानच्या इतिहासातील ‘काळा शब्द’ असल्याची टीका शरीफ यांनी केली आहे. न्यायालयामध्ये हा निर्णय देत असताना बाहेर कोणतीही तणावाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मोठय़ा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.