दहशतवादाला अर्थसाह्य़ रोखण्यात अपयश आल्यास कारवाई!

नवी दिल्ली : ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने (एफएटीएफ) पाकिस्तानला ‘करडय़ा यादी’तच कायम ठेवले असून लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांना होणारे आर्थिक साहाय्य रोखण्यात अपयश आल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

दहशतवादी कारवायांना होणारे अर्थसाह्य़ रोखण्यात यश आल्याचा दावा करून ‘एफएटीएफ’च्या तावडीतून सुटका करून घेण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न फोल ठरले आहेत.

‘एफएटीएफ’च्या पॅरिसमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला करडय़ा यादीतच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जूनपर्यंत व्यापक कृती योजना पूर्ण न केल्यास त्याचा पाकिस्तानच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला दिला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिद्दीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना होणाऱ्या अर्थसाह्य़ावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एफएटीएफ’ने केलेल्या २७ सूचनांपैकी पाकिस्तानने केवळ काही सूचनांचेच पालन केले आहे, याची ‘एफएटीएफ’ने नोंद घेतली. या दहशतवादी संघटनांचा भारतात हल्ले करण्यात हात आहे. पाकिस्तानने जूनपर्यंत आपली व्यापक कृती योजना पूर्ण केली पाहिजे, असे ‘एफएटीएफ’ने म्हटले आहे.

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिद्दीन यासारख्या संघटनांना पाकिस्तानकडून नियमित पाठिंबा मिळत असल्याचे भारताने वेळोवेळी स्पष्ट करून पकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याची विनंती ‘एफएटीएफ’ला केली आहे. पाकिस्तानला मलेशियाने जोरदार पाठिंबा दिला असला तरी भारताने ठोस पुरावे दिल्याने त्याचा काहीच परिणाम होऊ शकलेला नाही.

पाकिस्तानला करडय़ा यादीतून पांढऱ्या यादीत प्रवेशासाठी ३९ पैकी १२ मतांची गरज आहे, तर काळ्या यादीत जाणे टाळण्यासाठी पाकिस्तानला तीन देशांच्या पाठिंब्याची गरज आहे. ‘एफएटीएफ’च्या उपसमितीने पाकिस्तानला करडय़ा यादीत ठेवण्याची शिफारस तीन दिवसांपूर्वी केली होती.

परिणाम काय?

पाकिस्तानला करडय़ा यादीत कायम ठेवण्यात आल्याने त्यांना आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ), जागतिक बँक, एडीबी आणि युरोपीय समुदायाकडून आर्थिक साहाय्य मिळण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानच्या समस्यांमध्ये आणखी भर पडणार आहे. ‘एफएटीएफ’च्या आदेशांचे पालन करण्यात अपयश आल्यास पाकिस्तानला उत्तर कोरिया आणि इराणसह ‘काळ्या यादी’त टाकले जाऊ शकते.

चीनची पाकिस्तान प्रशंसा

बीजिंग : दहशतवादाला होणारे आर्थिक साहाय्य रोखण्यासाठी पाकिस्तानने प्रचंड प्रयत्न केले, अशी प्रशंसा पाकिस्ताचा मित्र असलेल्या चीनने केली आहे. त्याचप्रमाणे ‘एफएटीएफ’च्या पॅरिसमध्ये झालेल्या बैठकीत भारत आणि अन्य देशांना पाठिंबा दिल्याच्या वृत्ताचाही चीनने इन्कार केला आहे. पाकिस्तानने आपल्या बांधिलकीची पूर्तता करावी या भारत आणि अन्य देशांनी केलेल्या मागणीला चीनने पाठिंबा दिल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले की, एफएटीएफने पाकिस्तानला कृती योजनेची अंमलबजावणी करण्यास आणखी मुदत दिली आहे. अन्य संबंधित प्रश्नांबाबत चीनची भूमिका बदललेली नाही.