बिहारमध्ये भाजपचा पराभव झाल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील, हे भाजप अध्यक्ष अमित शहांचे विधान बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रचंड गाजले होते. मात्र, बिहारमधील दारूण पराभवानंतर शहांच्या याच विधानाचा धागा पकडून अनेक पाकिस्तानी वृत्तपत्रांनी मोदींना लक्ष्य केले आहे. विकासाच्या मुद्द्यापासून सुरू झालेला भाजपचा प्रचार अखेरच्या टप्प्यात जातीय आणि धार्मिक राजकारणापर्यंत जाऊन पोहचला होता. भाजपच्या प्रचाराची बदललेली हीच रणनीती अमित शहांच्या पाकिस्तानसंदर्भातील विधानातून अधोरेखित झाली होती. त्यामुळेच मोदी आणि शहा यांच्याभोवती केंद्रित असलेल्या बिहार निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर सोमवारी बहुतांश पाकिस्तानी प्रसारमाध्यमे मोदींना लक्ष्य करताना दिसली. पाकिस्तानील प्रसिद्ध ‘डॉन’ या वृत्तपत्राने बिहारने मोदींचे फटाके चोरले, अशा मथळ्याखाली बिहार निवडणुकीच्या निकालांची बातमी प्रसिद्ध केले आहे.

pak3
मोदींच्या गायीच्या राजकारणाला बिहारमधील जनतेने नाकारले, असेदेखील या बातमीत म्हटले आहे. याशिवाय, पाकिस्तानतील बहुतांश इंग्रजी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर बिहार निवडणुकीची बातमी झळकत असून त्याद्वारे मोदी आणि भाजपच्या राजकारणाला लक्ष्य करण्यात आले आहे. ‘बिहारच्या मतदारांनी मोदींना कुरणाबाहेरच ठेवले’, ‘अतिरेकीपणामुळे बिहारमध्ये मोदींच्या भाजपाने धूळ चाखली’, अशा मथळ्यांनिशी पाकिस्तानी वृत्तपत्रांनी मोदींवर टीका केली आहे.
pak2
बिहार निवडणुकीच्या प्रचारात भाजपमधील कट्टरतावाद्यांच्या विधानांना लगाम घालण्यात अपयशी ठरल्यामुळेही या वृत्तपत्रांनी मोदींना दोषी ठरवले आहे. पाकिस्तानातील ‘द नेशन’ आणि ‘जिओ टिव्ही’ यांसारख्या प्रसारमाध्यमांनी केलेल्या मार्मिक टीकेचा अपवाद वगळता येथील बहुतेक प्रसारमाध्यमांनी मोदींवर थेट टीका करणेच पसंत केले आहे.