दहशतवादावर आता पाकिस्तानची दुहेरी भूमिका चालणार नाही – लष्करप्रमुख

“कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.”

लष्करप्रमुख जनरल नरवणे

लष्करप्रमुख पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर जनरल एम. एम. नरवणे यांनी मंगळवारी देशाच्या सुरक्षेसंदर्भात विविध प्रश्नांवर आपली भुमिका स्पष्ट केली. दरम्यान, सर्वप्रथम त्यांनी दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानवर हल्लाबोल केला. दहशतवादाचा वापर करुन पाकिस्तान भारताविरोधात अप्रत्यक्षपणे युद्ध छेडत असून कारवाया केल्यानंतर पाकिस्तान याचा इन्कारही करीत आहे. मात्र, आता हे जास्त काळ चालणार नाही, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला आहे, एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली.

जनरल नरवणे म्हणाले, “दहशतवाद ही एक वैश्विक समस्या आहे. भारत मोठ्या काळापासून याचा सामना करीत आला आहे. आता तर जगातील अनेक देश या दहशतवादाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे आता त्यांना याच्या धोक्याचा अंदाज आला आहे. देशाचे धोरण असल्याप्रमाणे पाकिस्तान दहशतवादाद्वारे भारताविरोधात युद्ध छेडू पाहत आहे. अनेकदा कारवाया केल्यानंतर त्याने याचा इन्कारही केला आहे. मात्र, ही स्थिती आता जास्त काळ राहणार नाही कारण लोकांना आपण प्रत्येकवेळी मूर्ख बनवू शकत नाही.”

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील हिंसाचारात घट

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. इथल्या जनतेसाठी ही चांगली गोष्ट आहे. यामुळे राज्यात शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल, असे लष्करप्रमुख म्हणाले.

सैन्याला कायम सज्ज ठेवणे आपले लक्ष्य

“आपले मुख्य लक्ष्य सैन्याला कोणत्याही कारवायांसाठी कायम सज्ज ठेवणे हे असणार आहे. कोणत्याही कारवायांसाठी तयार राहणे हे एकवेळेचं काम नाही तर त्यासाठी आपल्याला नियमितपणे काम करीत रहावं लागेल. याचा उच्च दर्जा कायम राखण्यासाठी चांगली उपकरणं, चांगले तंत्रज्ञान आणि रणनीतीसाठी आपल्याला प्रत्येक दिवशी, महिनोमहिने काम करीत रहावे लागणार आहे,” अशी भुमिका जनरल नरवणे यांनी मांडली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pakistans double role on terrorism will not acceptable onwards says new army chief narawane aau

ताज्या बातम्या