पॅलेस्टाइन आणि व्हॅटिकन सिटी यांच्यात गेल्या वर्षी झालेला करार शनिवारपासून अंमलात आला. या करारानुसार व्हॅटिकनच्या रोमन कॅथॉलिक चर्चचे अधिकारक्षेत्र पॅलेस्टाइनच्या भूमीपर्यंत विस्तारणार हे. तसेच पॅलेस्टाइनमधील अल्पसंख्य ख्रिस्ती धर्मियांना संरक्षणही मिळणार आहे.
या कराराचे स्वरूप बहुतांशी धार्मिक असले तरी त्याकडे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या नजरेतून पाहिले जात आहे. स्वतंत्र पॅलेस्टाइला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या वाढत्या मान्यतेचे हे प्रतीक असल्याचे सांगत इस्रायलने हा करार मध्य आशियातील शांतता बिघडवणारा असल्याचे म्हटले आहे.
व्हॅटिकनच्या रोमन कॅथॉलिक चर्चने फेब्रुवारी २०१३ मध्ये स्वतंत्र पॅलेस्टाइनला मान्यता दिली. त्यानंतर २६ जून २०१५ रोजी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्याच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या बाबींची पूर्तता आतापर्यंत जाली असून शनिवारपासून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांनी परस्पर वाटाघाटींच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवावेत असे या करारात म्हटले असले तरी इस्रायलने या कराराचे फारसे स्वागत केलेले नाही.