काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी राजस्थानात भूखंड गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून भाजपने रणकंदन माजविल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी कामकाज होऊ शकले नाही.
वढेरा यांनी दिल्ली आणि हरियाणात अल्प किंमतीत जमिनी विकत घेऊन काही दिवसांतच त्या भरमसाठ किंमतीत विकल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर गेले काही दिवस झळकत आहेतच. लोकसभेत सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत भाजप खासदारांनी म्हणूनच वढेरांच्या विरोधात फलक नाचविले. ‘अर्थमंत्री महाशय, जावयाची क्लृप्ती वापरा आणि घरबसल्या कमवा आणि तोटा घटवा’ असे या फलकांवर लिहिले होते.
वढेरा यांनी राजस्थानात बिकानेर येथे अव्वाच्यासव्वा प्रमाणात जमीनखरेदी केल्याचा आरोप असून त्यावर तातडीने चर्चा व्हावी, अशी भाजपची मागणी होती. प्रश्नतास रद्द करून या प्रश्नावर चर्चा करण्याची सूचनाही भाजपने आधीच दिली होती. मात्र ती न स्वीकारता अध्यक्षा मीरा कुमार यांनी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देण्यास सांगितले. तेव्हा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. दुपारी दोनपर्यंत लोकसभा आणि राज्यसभेत दोनदा कामकाज स्थगित झाले. दोन वाजता कामकाज सुरू होताच बन्सल पुन्हा उभे राहाताच रालोआ खासदारांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेतच धाव घेतली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाले. राज्यसभेतही विरोधी खासदार सभापतींपुढील मोकळ्या जागेत घोषणा देऊ लागल्यावर कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाले.