नोटबंदीच्या निर्णयावरुन संसदेत काँग्रेसने सत्ताधारी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सध्या डॉक्टर न होताच सर्जरी केली जात आहे. प्रत्येकजण सर्जिकल स्ट्राईक केल्याचे बोलू लागलायं असे सांगत काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी सत्ताधा-यांवर टीकास्त्र सोडले आहे. गोव्यातील सभेत पंतप्रधानांनी बँकेसमोर रांगेत उभे राहणा-या सर्वसामान्यांची खिल्ली उडवली. यासाठी त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणही काँग्रेसने केली आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले असले तरी राज्यसभेत नोटबंदीवरुन विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. बाजारात पाचशे आणि हजारच्या नोटांच्या प्रमाण ८६ टक्के होते. मग हा सगळा काळा पैसा होता का असा प्रश्न आनंद शर्मा यांनी उपस्थित केला. आमच्या बँकखात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध आणण्याचे अधिकार तुम्हाला कोणत्या कायद्याने दिला असा संतप्त सवालच त्यांनी सरकारला विचारला. नोटबंदीच्या निर्णयामुळे भारताची अर्थव्यवस्था काळ्या पैशावरच चालते असा चुकीचा संदेश जगभरात गेला असा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणा-यांच्या राष्ट्रप्रेमावरच प्रश्न उपस्थित होऊ लागलेत याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
मोदींनी ८ नोव्हेंबररोजी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. १० नोव्हेंबरला बँक पुन्हा सुरु होतील आणि दोन हजारच्या नवीन नोटा बाजारात येतील अशी घोषणा सरकारने केली. पण गोरगरीब जनता दररोजच्या व्यवहारात ही दोन हजारची नोट कशी वापरणार. आठ दिवसांनंतर नोटबंदीमुळे निर्माण झालेला गोंधळ थांबलेला नाही. स्टेट बँकेला सहा महिन्यांपूर्वी नोटबंदीचे संकेत मिळाले होते, मग त्यांनी त्यादृष्टीने तयारी का केली नाही अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी सरकारवर केली. कर्नाटकमध्ये भाजप नेते जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नात पाचशे कोटी रुपये खर्च होतात हेदेखील त्यांनी निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, सकाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सरकार कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे मोदींनी सांगितले. अधिवेशनात प्रत्येक विषयावर खुलेपणाने चर्चा व्हावी, असे सरकारचे मत आहे. त्यामुळे आम्ही सर्व विरोधी पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा करतो, असे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले. मागील अधिवेशनात वस्तू व सेवा कर विधेयकासारखे (जीएसटी) ऐतिहासिक विधेयक मंजूर झाले होते. त्यावेळी मी सर्व पक्षांचे आभार मानले होते. हिवाळी अधिवेशनातही आम्हाला विरोधी पक्षांकडून तशाचप्रकारच्या सहकार्याची आणि सकारात्मक चर्चेची आम्हाला अपेक्षा आहे. प्रत्येक मुद्द्यावर विरोधक, सरकार आणि जनतेच्या गरजांच्या दृष्टीकोनातून चर्चा होण्याची गरज यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केली.