मध्यप्रदेशातील रीवा येथे भीषण दुर्घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग ३० वर बस आणि ट्रकमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून, ४० जण प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस रीवा येथून इलाहाबादकडे जात होती. उत्तरप्रदेशचे असलेले हे प्रवाशी दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त घरी परतत होते. रात्री राष्ट्रीय महामार्ग ३० वर ट्रेलरचा गाडीशी अपघात झाला. त्यामुळे अनेक वाहने महामार्गावर उभी होती. त्यातच मागून जोरात येणाऱ्या बसने महामार्गावर उभा असलेल्या ट्रकला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, बसच्या समोर बसलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून चार जवानांचा मृत्यू; चीन सीमेजवळ दुर्घटना
बससमध्ये शंभरपेक्षा अधिक प्रवाशी होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर, गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात दाखल केलं.