गोव्यातील सुप्रसिद्ध फेणीला भौगोलिक दर्जा मिळाल्यानंतर आता निर्मितीप्रक्रियेचे पेटण्ट मिळावे यासाठी संशोधक आणि उत्पादक प्रयत्नशील आहेत. आपल्या औषधी गुणांसाठीही फेणी प्रसिद्ध आहे.
कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करून फेणीनिर्मितीच्या प्रक्रियेचे पेटण्ट घेण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) तयारी सुरू केली आहे.
काजूची बोंडे काढण्यापासून ते फेणी तयार करण्यात येईपर्यंत ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो त्या प्रक्रियेचे पेटण्ट घेण्याचा मानस असल्याचे गोव्यातील आसीएआरचे संचालक डॉ. एन. पी. सिंग यांनी सांगितले. आयसीएआरच्या वतीने भारतीय पेटण्ट प्राधिकरणाकडे अर्ज दाखल करण्यात आला असून, जागतिक पातळीवरून हरकती मागविल्यानंतर प्राधिकरण या प्रक्रियेला मान्यता देणार आहे. सदर पेटण्ट मिळावे यासाठी गोव्यातील फेणी उत्पादकांची प्रक्रिया अभिनव असली पाहिजे, असे डॉ. सिंग म्हणाले. स्थानिकांच्या मदतीने संशोधक प्रयत्नशील असून आयसीएआर यासाठी अन्य व्यापाऱ्यांच्याही संपर्कात आहे.