भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी गुगल मॅपचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. पठाणकोट हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ही बाब नमूद करण्यात आली आहे. एप्रिल २०१४ मध्ये सियालकोट येथील बैठकीत जैश-ए-मोहम्मदचा हस्तक शाहिद लतीफ याने पठाणकोट हल्ल्याची आखणी केली होती. पठाणकोट हवाई तळाच्या परिसरात असलेल्या जंगलामुळे याठिकाणी हल्ला करणे सोपे आहे, असा विश्वास लतीफला वाटत होता, असे एनआयएने म्हटले आहे. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे सात जवान शहीद झाले होते, तर ३८ जण जखमी झाले होते. या हल्ल्यापूर्वी लतीफने संभाव्य हल्लेखोर दहशतवाद्यांना पठाणकोट हवाई तळाचा गुगल मॅपवर उपलब्ध असणारा नकाशा दाखवला होता. बैठकीला उपस्थित असणाऱ्या व्यक्तीकडून या माहितीची पुष्टी करण्यात आली आहे.
एनआयएने दाखल केलेल्या १०१ पानांच्या आरोपपत्रात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्या मसूद अजहर, त्याचा भाऊ रउफ असगर, शाहिद लतीफ आणि कासिम जान यांना आरोपी करण्यात आले आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. पठाणकोटच्या हवाई तळावर हल्ला करण्याचा कट अजहर मसूदने कशाप्रकारे रचला, त्याची संपूर्ण माहिती आरोपपत्रात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हवाई दलाच्या जवानांचे बळी घेणे आणि दारुगोळ्याचा साठा उद्ध्वस्त करणे, हेच या हल्ल्याचे उद्दिष्ट होते, अशी माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे. आरोपपत्रात उल्लेख असलेल्या चारही दहशतवाद्यांचे संभाषण, त्यांचे पत्ते, कुटुंबीयांची माहिती एनआयएकडे आहे. याशिवाय जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे हजारो मेसेज, चॅट्स आणि आवाजांचे नमुने एनआयएकडे आहेत. पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध नासिर हुसेन, अबू बकर, उमर फारुख आणि अब्दुल कयूम खान या चार आत्मघाती दहशतवाद्यांनी एक जानेवारीला पठाणकोटच्या हवाई तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ७ जवान शहीद झाले होते. यानंतर एनएसजी आणि लष्कराच्या जवानांनी ऑपरेशन धंगू हाती घेत सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.