Pfizer Whistleblower : बोईंगमधील अफरातफरी बाहेर काढणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मेलिसा मॅकॅईटी यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच मी कधीही आत्महत्या करणार नाही मी माझ्या पती आणि मुलांसह आनंदात आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या व्हिडीओ प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे व्हिडीओत?

फायजरच्या माजी कर्मचारी मेलिसा मॅकॅईटी यांनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्या म्हणत आहेत, “मी कधीही आत्महत्येचं पाऊल उचलणार नाही. मात्र माझ्या जिवाला धोका आहे. या व्हिडीओद्वारे सांगू इच्छिते की माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार फक्त फार्मा कंपनी आणि सरकार असेल. मी आत्महत्येचा प्रयत्न कधीही करणार नाही. मी कौटुंबिक आयुष्यात सुखात आहे. कुठल्याही अडचणींचा सामना मी करत नाही.” असं मेलिसा यांनी म्हटलं आहे.

करोनाच्या ‘या’ लशीमुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका? अमेरिकेच्या सीडीसी संस्थेचा धक्कादायक अहवाल

मेलिसा मॅकॅईटी कोण आहेत?

मेलिसा मॅकॅईटी या फायझर कंपनीच्या लसीचा गैरव्यवहार समोर आणला होता. त्या या प्रकरणातल्या व्हिसलब्लोअर आहेत. त्यांनी कंपनीचे मेलही लिक केले होते. मेलिसाने फायजरच्या लसीमुळे शरीरावर होणारे परिणाम आणि लोकांच्या मृत्यूंबाबत चिंताही व्यक्त केली होती.

मेलिसा यांनी काय म्हटलं आहे?

मेलिसा म्हणाल्या, “मी माझं आयुष्य मजेत जगते आहे. कोणत्याही तणावात मी नाही. मानसिक दृष्ट्या अस्वस्थ नाही . माझं माझ्या नवऱ्यावर आणि माझ्या मुलांवर प्रेम आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही, त्यामुळे मी आत्महत्येचा विचार देखील करु शकत नाही. माझ्या घरातही चांगलं वातावरण आहे. उद्या किंवा यानंतर कधीही माझ्या आयुष्याचं काही बरंवाईट झालं तर त्याला फार्मा कंपनी आणि सरकार जबाबदार असेल. माझे कुटुंबीय त्यासाठी जबाबदार नसतील असं मेलिसा यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडीओची चर्चा एक्स या सोशल मीडिया साईटवरही रंगली आहे.

हे पण वाचा- कोव्हिशिल्ड लस दुष्परिणामांमुळे मागे घ्यावी लागली? ॲस्ट्राझेनेका म्हणते मागणीपेक्षा साठा अधिक!

२०२१ मध्ये फायजरच्या लसीला मान्यता मिळाली होती. करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसींमध्ये या लसीचा समावेश झाला होता. लस १५ वर्षांवरील मुलांना आणि प्रौढांना देण्यास मान्यता देण्यात आली होती. आता या प्रकरणात व्हिसलब्लोअर मेलिसा यांचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.