येथे ख्रिस्तीज या कंपनीने आयोजित केलेल्या लिलावात पाब्लो पिकासोच्या चित्राला विक्रमी म्हणजे १७९.४ दशलक्ष डॉलर इतकी किंमत मिळाली, तर शिल्पकार अल्बटरे गियाकोमेट्टी यांचे शिल्प १४१.३ दशलक्ष डॉलर इतक्या विक्रमी किमतीला विकले गेले. पिकासोचे ‘विमेन ऑफ अल्जीयर्स’ हे चित्र व गियाकोमेटीचे ‘पॉइंटिंग मॅन’ हे शिल्प प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरले.
ख्रिस्तीजचे जागतिक अध्यक्ष ज्युसी पलकानेन यांनी सागितले, की हे दोन कलेचे उत्कृष्ट नमुने होते व त्यांना जास्त किंमत आली. ज्यांनी या कलाकृती विकत घेतल्या, त्यांची नावे सांगण्यात आली नाहीत. एकूण ३५ पैकी ३४ कलाकृती ७०६ दशलक्ष डॉलर्सना विकल्या गेल्या. विमेन्स ऑफ अल्जियर्स हे चित्र एके काळी अमेरिकेचे व्हिक्टर व सॅली गँझ यांच्या मालकीचे होते. त्या चित्रामागे पिकासोला १९ व्या शतकातील फ्रेंच कलाकार युजेन डेलाक्रॉइक्स यांच्या कलाकृतींची प्रेरणा लाभली होती. १९५४-५५ मध्ये पिकासोने जी १५ चित्रे काढली होती, त्यातील ते एक आहे. यापूर्वी फ्रान्सिस बेकनची ‘थ्री स्टडीज ऑफ ल्युशियन फ्रॉइड’ या कलाकृतीला २०१३ मध्ये १४२.४ दशलक्ष डॉलर्स मिळाले होते. पॉइंटिंग मॅन हे ब्राँझचे शिल्प असून ते ४५ वर्षांपूर्वीच्या संकलनातील आहे. गियोकोमेट्टी याने जी सहा शिल्पे तयार केली होती, त्यातील ते एक आहे. त्यातील चार संग्रहालयात आहेत. त्याच्या वॉकिंग मॅन आय या शिल्पास २०१० मध्ये १०४.३ दशलक्ष डॉलर्स मिळाले होते.