आठवडाभरापूर्वी दहशतवाद्यांकडून हल्ला चढवण्यात आलेल्या पठाणकोट येथील भारतीय वायूदलाच्या तळाला शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी हवाई तळावर तिन्ही दलांच्या लष्करप्रमुखांची भेट घेऊन पठाणकोट हल्ल्यासंबंधीची माहिती जाणून घेतली. दरम्यान, मोदींच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. यावेळी मोदी यांनी पठाणकोट तळाची हवाई पाहणीही केली. यावेळी भूदल, वायूदल, एनएसजी आणि सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या ऑपरेशनची आणि शोध मोहिमेची माहिती दिली.
पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर सहा अतिरेक्यांनी मागील शनिवारी हल्ला चढवला होता. या दहशतवाद्यांचा खात्मा करताना भारतीय लष्कराचे सात जवान शहीद झाले होते. दरम्यान, पठाणकोट हल्ल्यासंबंधित सर्व पुरावे भारताने पाकिस्तानकडे सुपूर्द केले आहेत. हल्ल्याबाबत भारताने जी माहिती पुरवली आहे, तिच्या आधारे या हल्ल्याचा तपास करण्याचे आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिल्याचे वृत्त पाकिस्तानच्या एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.

नवाझ शरीफ यांचे चौकशीचे आदेश