भारताच्या पंतप्रधानांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले ‘७ रेसकोर्स रोड’ हे नाव बदलण्याच्या हालचाली केंद्रात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ‘७ रेसकोर्स’ या नावात बदल करून ‘७ एकात्म मार्ग’ असे करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी यांनी तसा प्रस्ताव नवी दिल्ली महानगरपालिकेकडे सादर केला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नामांतर ‘७ एकात्म मार्ग’ असे करण्यात यावे, असे लेखी यांनी दिलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
मिनाक्षी लेखी या दिल्ली महानगरपालिकेच्या सदस्या असून, बुधवारी होणाऱया महानगरपालिकेच्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. ‘७ रेसकोर्स रोड’ हे नाव भारतीय संस्कृतीशी मेळ खात नाही, त्यामुळे ते बदलून ‘एकात्म मार्ग’ करायला हवे, लेखी यांचे म्हणणे आहे. याशिवाय, पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नाव एकात्म मार्ग ठेवल्यास यापुढे देशातील प्रत्येक पंतप्रधानाची नाळ समाजाच्या शेवटच्या व्यक्तीशी जोडली जाईल, असेही त्या पुढे म्हणाल्या. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नाव ‘७ एकात्म मार्ग’ करण्यात यावे, असेही सांगण्यात येत आहे.