धोरणांची अंमलबजावणी करण्यात नरेंद्र मोदींचा वेग हा बुलेट ट्रेनप्रमाणे आहे, या शब्दांत जपानचे पंतप्रधान शिंझो एब यांनी भारतीय पंतप्रधानांचे कौतुकाचा वर्षाव केला. जपानचे पंतप्रधान शिंझो एब तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान झालेल्या भारत व जपानमधील उद्योजकांच्या झालेल्या परिषदेत शिंझो एब बोलत होते.
भारत-जपान बिझनेस समिटदरम्यान आधी मोदी म्हणाले की, भारताला हायस्पीड ट्रेनबरोबरच हायस्पीड ग्रोथ (विकास) देखिल हवी आहे. त्यावर बोलताना एब म्हणाले की, मोदी तर पॉलिसीसुद्धा बुलेट ट्रेनच्या वेगानेच लागू करत आहेत. मोदींची धोरणे वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह असून अनेक लोकांना बरोबर घेणारी आहेत. मजबूत भारत हा आमच्या जपानसाठीही फायद्याचा ठरेल. तसेच मजबूत जपान भारतासाठी फायद्याचा आहे, असेही ते म्हणाले.
जपान प्रथमच भारतातून मारूती सुझूकी या मोटारींची आयात करणार असल्याची माहितीही मोदींनी यावेळी दिली. दोन्ही देशांदरम्यानच्या नागरी अणू करारावरही या वेळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ऍब यांच्या दौ-याकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत.