पंतप्रधान नरेद्र मोदी यांना फिजी देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मोदी हे जागतिक नेतृत्व असल्याचे सांगत त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. फिजी देशाचा हा सर्वोच्च पुरस्कार फिजीबाहेरच्या केवळ काहीच लोकांना देण्यात आला आहे. नरेंद्र मोदी हे त्यापैकी एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहेत. दरम्यान, पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे काल (२० मे) स्वतः मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. मोदींचं स्वागत करताना जेम्स मारापे यांनी मोदींच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मोदींनीही लगेच मारापे यांची गळाभेट घेतली. दरम्यान, फिजीच्या पंतप्रधानांच्या हस्ते फिजीचा सर्वोच्च सन्मान "कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी" प्रदान केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, हा सन्मान फक्त माझा नाही तर १४० कोटी भारतीयांचा आहे, भारत आणि फिजीचं जुनं नातं आहे. त्याबद्दल मी तुमचे (सितिवेनी राबुका) आणि राष्ट्रपतींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. हे ही वाचा >> २००० च्या नोटा कधीपासून बदलून मिळणार? RBI नं रीतसर नोटिफिकेशनच केलं जारी; बँकांना दिले ‘हे’ निर्देश! पापुआ गिनीनेही केला गौरव फिजीने पंतप्रधानांचा गौरव केल्यानंतर पापुआ गिनीनेदेखील मोदींचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी पतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत तुमचा विकासातला सहकारी आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे. कोणतीही मानवी सहाय्यता असो अथवा विकास असो तुम्ही भारताकडे एक विश्वासू सहकारी म्हणून पाहू शकता. आम्ही आमचा अनुभव आणि क्षमता तुमच्यासोबत शेअर करायला तयार आहोत. कोणत्याही संकोचाशिवाय आम्ही हे करू.