टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला २३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्पर्धकांच्या कुटुंबियांशीही वार्तालाप केला. प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी १५ खेळाडूंशी चर्चा केली. यात मेरी कॉम, सानिया मिर्झा, दीपिका कुमार, प्रविण जाधव, नीरज चोपडा यांचा समावेश होता. प्रविण जाधव याच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत संवाद साधत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच इतर खेळाडूंच्या जीवनपट जाणून घेतला. या चर्चेत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री किरण रिजीजू उपस्थित होते.

टोकियो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धामध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. गेल्या वर्षी करोना संकटामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. आतापर्यंत स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची ही सर्वाधिक संख्या आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला तीरंदाज दीपिका कुमारी हिच्याशी संवाद साधला. “पॅरिसमधील विश्वचषकात सुवर्ण पदक पटकावून तू नंबर एक झाली आहेस. तुझा प्रवास उल्लेखनीय आहे. लहानपणी तुला आंबे आवडत होते. मग तीरंदाजीला सुरुवात कधी केली?” असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला. “मला यात सुरुवातीपासूनच आवड होती. मी धनुष्यापासून सुरुवात केली आणि हळूहळू आधुनिक धनुष्य हाती घेतलं आणि पुढे जात गेली”, असं दीपिका कुमारीने सांगितलं. ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या आशीष कुमार याच्याशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा उल्लेख केला. विश्वचषकादरम्यान सचिनच्या वडिलांचं देहवसन झालं होतं. मात्र दुखातून सावरत पुन्हा एकदा क्रिकेट खेळला. आशीषच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आहे. त्याचं सांत्वन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा उल्लेख केला आणि त्याला शुभेच्छा दिल्या.

विजय मिळाल्यानंतर आपण एकत्र आइसक्रीम खाऊ- पीएम मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रियो ऑलिम्पिक स्पर्धेत रजत पदक पटकावणाऱ्या बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिच्याशी संवाद साधला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर एकत्र आइसक्रिम खाऊ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी तिला सांगितलं. सिंधुला तिचे आई-वडील आइसक्रीम खाऊ देत नाहीत, याचा उल्लेख करत मोदींनी हे सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉक्सर मेरी कॉम हिच्याशी संवाद साधत तुझा आवडता खेळाडू कोण? असा प्रश्न विचारला. यावर मेरी कोमने माझा आवडता खेळाडू मोहम्मद अली असल्याचं सांगितलं. तो माझ्यासाठी आदर्श आहे, असं मेरी कोमनं सांगितलं.


भालाफेकपटू नीरज चोपडा याच्याशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला मोलाचा सल्ला दिला. ऑलिम्पिकमध्ये अपेक्षांच्या ओझ्याखाली राहण्याची गरज नाही. निर्भिडपणे खेळण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. मेरी कॉम आमि मनप्रीत सिंह भारताचे ध्वजवाहक असणार आहेत. तर कुस्तीपटू बजरंग समारोप कार्यक्रमात ध्वजवाहक असणार आहे.