केंद्रातील भाजप सरकारच्या पहिल्या वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी मंत्रिमंडळातील प्रमुख नेत्यांची भेट घेतली. चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या तीन देशांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावरून नरेंद्र मोदी काल रात्री दिल्लीत परतले. त्यानंतर आज सकाळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील अरूण जेटली, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, वेंकय्या नायडू आणि नितीन गडकरी या प्रमुख नेत्यांसह बैठक घेतली. या बैठकीत २६ मे रोजी सरकारचा वर्षपुर्ती सोहळा साजरा करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील मोदींशी स्वतंत्रपणे चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनूसार, मोदींनी या बैठकीत नेत्यांना सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचे आदेश दिले. याशिवाय, सामाजिक क्षेत्रात मोदी सरकारने सुरू केलेल्या उपक्रमांबद्दलही जनजागृती करण्याचे आदेश मोदींकडून देण्यात आले आहेत.