नवी दिल्ली : आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता कुणीही लसीकरणाशिवाय राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच ध्वनिमुद्रित करण्यात आलेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात केले आहे.लसीकरण हे करोना प्रतिबंधासाठीचे एक सुरक्षा जाळे आहे, त्यातून कुणीही बाहेर राहता कामा नये. त्याशिवाय करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मन की बात या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की सणासुदीचा काळ जवळ येत आहे आणि लोकांनी कोविड विरोधातील लढय़ाची जाणीव ठेवावी. दैनंदिन काळात टीम इंडिया अनेक विक्रम प्रस्थापित करीत आहे. अनेक उच्चांक लसीकरणात निर्माण करण्यात आले आहेत. त्याची जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. केवळ आपण आपल्यापुरती लस घेऊन भागणार नाही, तर कुणीही लसीकरणाच्या जाळ्यातून बाजूला राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

मोदी यांनी या वेळी सांगितले, की जागतिक नदी दिन साजरा होत असून आपल्या नद्या प्रदूषण मुक्त ठेवण्याची गरज आहे.  वर्षांतून एकदा ‘नदी महोत्सव’ साजरा करण्याची कल्पना त्यांनी  देशवासीयांपुढे मांडली.

देशात दिवसभरात २८,३२६ बाधितांची नोंद 

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत २८,३२६ लोक करोनाग्रस्त झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ३,३६,५२,७४५ इतकी झाली. याच कालावधीत २६० लोक करोनामुळे मृत्युमुखी पडल्याने करोनामृत्यूंचा आकडा ४,४६,९१८ वर पोहचला.

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती ३,०३,४७६ इतकी झाली असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ०.९० टक्के आहे. आतापर्यंत ३,२९,०२,३५१ लोक बरे झाले असून त्यांचे प्रमाण ९७.७७ टक्के इतके आहे. गेल्या २४ तासांच्या कालावधीत उपचाराधीन रुग्णांची संख्या २०३४ ने वाढली. मृत्युदर १.३३ टक्के इतका आहे.

देशव्यापी  मोहिमेत आतापर्यंत लशींच्या ८५.६० कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांत मरण पावलेल्या २६० जणांमध्ये १२० जण केरळमधील, तर ५८ महाराष्ट्रातील आहेत. करोनाने आतापर्यंत देशात ४,४६,९१८ बळी घेतले आहेत. यात महाराष्ट्रातील १,३८,८३४, कर्नाटकातील ३७,७१७, तमिळनाडूतील ३५४७६, दिल्लीतील २५०८५, केरळमधील २४४३८, उत्तर प्रदेशातील २२८९० आणि पश्चिम बंगालमधील १८७२७ जणांचा समावेश आहे.

मोदींना बोलवा, तरच लस घेईन धार : आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच करोनाची पहिली लस घेऊ असा आग्रह मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्य़ातील एका व्यक्तीने धरल्याने अधिकारी बुचकाळ्यात पडले. शनिवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पसरला. लसीकरण चमू जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १३० किलोमीटवर  किकरवास या आदिवासी खेडय़ात गेल्यावर हा अनुभव आला. ‘तुम्हाला एसडीएम (उपविभागीय दंडाधिकारी) इथे आलेले हवे आहेत का?’, असे या चमूने त्याला विचारले; तेव्हा (पंतप्रधान) मोदी यांना बोलावण्यासाठी एसडीएमना सांगा, असे हा गावकरी म्हणाला.