चांद्रयान-२ चे विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास अयशस्वी ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले दिलासादायक भाषण, मनापासून दिलेला पाठिंबा आणि कनवाळू शब्द यामुळे आमच्या शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढले, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. शिवन यांनी रविवारी सांगितले.

पंतप्रधानांचे भाषण आणि देश इस्रोच्या पाठीमागे उभा राहिल्याचे पाहून आम्हाला आत्यंतिक आनंद झाला. याने आमचे मनोधैर्य वाढवले आहे, असे शिवन यांनी पीटीआयला सांगितले.

आम्ही भारावून गेलो आहोत. देशाने आम्हाला चांगला व सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधानांचे एक वेगळेच रूप आम्हाला काल पाहायला मिळाले, असे शिवन म्हणाले.

पंतप्रधानांनी अतिशय उत्कटपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते अतिशय भावुक झाले होते आणि त्यांनी अतिशय अर्थपूर्ण शब्द वापरून सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही याहून अधिक काही चांगल्याची अपेक्षा करू शकलो नसतो, अशा भावना शिवन यांनी व्यक्त केल्या.

आम्ही देशाबाबत आणि पंतप्रधानांबाबत नक्कीच कृतज्ञ आहोत, असे इस्रोचे माजी प्रमुख ए. एस. किरणकुमार म्हणाले. लॅण्डरचे ‘सॉफ्ट लॅण्डिंग’ होण्यासाठी शेकडो आणि हजारो प्रकारचे बदल होऊ शकत होते, यावरून त्यातील गुंतागुंत लक्षात येते असे त्यांनी सांगितले. देश आणि देशवासीय याची नोंद घेऊ शकले आणि त्यांनी त्यांचा पाठिंबा कायम ठेवला. ही अतिशय सकारात्मक बाब आहे. आम्ही संपूर्ण देशाबाबत कृतज्ञ आहोत, असेही त्यांनी नमूद केले.