नीरव मोदी घोटाळाप्रकरणी बदनाम झालेल्या पंजाब नॅशनल बँकेवर आता कर्जबुडवेपणाचा ठप्पा बसू शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये आजतागायत न झालेला हा प्रकार घडला तर तो भारत सरकारसाठी लाजिरवाणा असेल. पंजाब नॅशनल बँकेला लेटर ऑफ अंडरस्टँडिंगच्या संदर्भात काही दिवसांमध्ये युनियन बँकेला एक हजार कोटी रुपयांची परतफेड करायची आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ही मुदत पाच दिवसांवर ठेपली असून जर पंजाब नॅशनल बँकेने भरणा केला नाही तर युनियन बँकेच्या लेखी पीएनबी ही डिफॉल्टर किंवा कर्जबुडवी बँक असेल. ही लाजिरवाणी घटमा टाळण्यासाठी भारत सरकार व रिझर्व्ह बँक यांनाच पावले उचलावी लागतील अशी शक्यता आहे.

पंजाब नॅशनल बँकेला हे एक हजार कोटी रुपये 31 मार्चच्या आत भरायचे आहेत. असा प्रकार यापूर्वी कधी घडलेला नाही. एका सरकारी बँकेच्या देण्यापोटी दुसरी सरकारी बँक कर्जबुडवी म्हणून घोषित झाल्याची व सदर रक्कम बुडित कर्जात नोंद करण्याची घटना याआधी घडलेली नाही. कर्जाच्या रकमेचा भरणा झाली नाही, आर्थिक फसवणूक झाली तर बँकेला लगेच तशी तरतूद करावी लागते, तसेच सदर रकमेची नोंद एनपीए किंवा बुडीत कर्ज अशी करावी लागते. युनियन बँकेने तसे केल्यास लगेच पीएनबीवर डिफॉल्टर किंवा कर्जबुडवी बँक असा शिक्का बसेल.

“पीएनबीकडून आम्हाला येणं आहे ही खरी गोष्ट आहे. आम्ही लेखापालांचा सल्ला घेऊ. आम्हाला पीएनबीला डिफॉल्टर म्हणून जाहीर करायचं नाहीये. त्यामुळे सरकार व रिझर्व्ह बँक 31 मार्च पूर्वी काहीतरी मार्ग काढेल अशी आशा आहे,” युनियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजकिरण राय यांनी म्हटल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिलं आहे.

लेटर ऑफ अंडरस्टँडिंगवर विसंबून कर्ज दिलेल्या काही बँका व पंजाब नॅशनल बँक यांच्यामध्ये काही मुद्यांवरून मतभेद असले तरी नीरव मोदी व मेहूल चोक्सी यांचा कर्जबुडवेपणा हा घोटाळा असल्याबाबत सगळ्यांचे एकमत आहे. अशा परिस्थितीमध्ये काही तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार 31 मार्च पूर्वी परतफेडीस पात्र असलेल्या लेटर ऑफ अंडरस्टँडिंगना या आर्थिक वर्षातली बुडीत कर्जे म्हणूनच समजले जायला हवे. 31 मार्चनंतर परतफेडीसाठी पात्र ठरलेल्या एलओयूसंदर्भातही पीएनबीकडून हमी घ्यावी असा सल्ला काही लेखापाल आपापल्या बँकांना देऊ शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच नीरव मोदी घोटाळ्याची काळी छाया आर्थिक वर्ष संपताना पीएनबीच्या डोक्यावर जास्त गडद होताना दिसण्याची शक्यता आहे.