scorecardresearch

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोषी

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान  एका पोर्न स्टारला मौन राखण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आला आहे.

dv donald trump
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोपनिश्चिती झाल्यानंतर वॉशिग्टनमधील व्हाईट हाऊससमोर शुक्रवारी विद्यार्थी आणि पर्यटक जमा झाले होते.

पीटीआय, न्यूयॉर्क : Donald Trump Porn star bribery case डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान  एका पोर्न स्टारला मौन राखण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आला आहे. ‘मॅनहटन ग्रॅंड ज्युरी’ने हा निर्णय दिला. अमेरिकी लोकशाहीच्या १६० वर्षांच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना असून गुन्हेगारी आरोप ठेवण्यात आलेले ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष ठरले आहेत. ट्रम्प यांनी मात्र स्वत:वरील आरोप फेटाळले आहेत.

या घडामोडींनंतर २०२४ मध्ये पुन्हा अध्यक्षीय निवडणूक लढवण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मॅनहटन जिल्हा सरकारी वकिलांच्या (अ‍ॅटर्नी) अल्विन ब्रॅग यांच्या कार्यालयाने, गुरुवारी संध्याकाळी ट्रम्प यांच्यावरील अवर्गीकृत आरोपांसदर्भात ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणाच्या समन्वयासंदर्भात त्यांच्या वकिलांशी संपर्क साधल्याचे सांगितले. या संदर्भात खटल्याची तारीख निश्चित झाल्यावर पुढील तपशील कळवला जाईल.

‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार ‘ग्रँड ज्युरी’ने गुरुवारी ७६ वर्षीय ट्रम्प यांनी ‘पोर्न स्टार’ स्टॉर्मी डॅनियल्सला एका कथित प्रकरणात मौन राखण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्याच्या बाजूने मतदान केले. ट्रम्प हे सोमवारी फ्लोरिडा येथील त्यांच्या घरातून न्यूयॉर्कला जाण्याची शक्यता आहे आणि मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, असे या प्रकरणाच्या दोन जाणकार स्रोतांनी सांगितले. या वेळी न्यायालयातील कार्यवाही थोडक्यात आटोपण्याची शक्यता आहे. सुमारे दहा-पंधरा मिनिटे चालणाऱ्या या सुनावणीत आरोपपत्रातील आरोप ट्रम्प यांना वाचून दाखवले जातील. ट्रम्प यांच्यावरील आरोप म्हणजे निवडणूक वर्षांत राजकीय प्रतिस्पर्ध्याला लक्ष्य करण्याची संधिसाधू कृती आहे, अशी टीका ट्रम्प यांचे पुत्र एरिक यांनी केली आहे, तर या खटल्याला पूर्ण ताकदीने सामोरे जाणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

डोनाल्ड ट्रम्प यांचे २००६ मध्ये स्टॉर्मी डॅनियल्सबरोबर लैंगिक संबंध होते. मात्र, २०१६ च्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान तिने मौन बाळगावे यासाठी ट्रम्प यांचे माजी वकील कोहेन यांनी तिला एक लाख ३० हजार डॉलर दिल्याचा आरोप आहे. या व्यवहाराची माहिती कोहेन यांनी यापूर्वीच न्यायालयाला दिली आहे.

माझा राजकीय छळ : ट्रम्प

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी या प्रकारास ‘राजकीय छळ आणि आतापर्यंतच्या इतिहासात निवडणुकीत सर्वोच्च स्तरावरून झालेला हस्तक्षेप’ असे संबोधून टीका केली. राजकीय प्रतिस्पर्ध्याना शिक्षा करण्यासाठी न्यायव्यवस्थेचा शस्त्रासमान वापर केल्याचा आरोपही त्यांनी डेमॉक्रॅटिक पक्षावर केला. तसेच सरकारी वकील अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी संगनमत केल्याचाही त्यांनी आरोप केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या