आपण विशिष्ट परिस्थितीत आपले वर्तन बदलतो, पण ते नेमके कसे घडून येते हे माहीत नव्हते, परंतु मेंदूत असलेल्या एका स्वीचच्या (कळ) माध्यमातून या वर्तनाचे नियंत्रण केले जाते, ही कळ वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. एली लीली व मिशिगन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी मेंदूतील अॅसिटिलकोलिन या न्यूरोट्रान्समीटरची पातळी मोजली असता त्यांना वर्तनाच्या नियंत्रणाचे गूढ उलगडले आहे. हे रसायन माणसाची लक्ष केंद्रित करण्याची ताकद व स्मरणशक्ती यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. यात करण्यात आलेल्या प्रयोगात उंदरांना पडद्यावर काही संदेश (सिग्नल्स) दाखवण्यात आले व प्रत्येक वेळी त्यांना पडद्यावर विद्युतीय संदेश दिसला की नाही हे ओळखायचे होते. जेव्हा हा संदेश दीर्घ काळानंतर येत असे किंवा संदेशच येत नसे तेव्हा उंदरांच्या मेंदूतील प्रिफ्रंटल कॉर्टेक्स भागातील अॅसिटिलकोलिनच्या प्रमाणात फरक जाणवत असे. जेव्हा असा संदेश नंतर लगेच आला तेव्हा त्यांच्यातील अॅसिटिलकोलिनमध्ये फरक जाणवत नसे.
सिंडी ल्युसडिग या संशोधिकेने सांगितले, की यात अॅसिटिलकोलिनच्या प्रमाणात वाढ होते तेव्हा संदेशाला प्रतिसाद मिळतो म्हणजेच ती स्वीच ऑन अवस्था असते, पण जेव्हा अगोदरच तसा प्रतिसाद मिळालेला असतो तेव्हा त्यात अकारण वाढ होते. फक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे एफएमआरआय तंत्राने मानवी मेंदूचा अभ्यास केला असता असे दिसून आले की, जेव्हा मालिकेतील पहिला संदेश येतो त्या वेळी उजव्या भागातील प्रिफ्रंटल कॉर्टेक्समध्ये क्रियाशीलता वाढलेली दिसते.
माणसाच्या मेंदूत अशा प्रयोगात नेमके काय घडू शकेल याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ऑक्सिजनच्या पातळीचा अभ्यास केला. त्या वेळीही मालिकेतील पहिल्या संदेशाला उजव्या प्रिफ्रंटल कॉर्टेक्समध्ये मिळालेला प्रतिसाद सारखाच होता. अॅसिटिलकोलिन संग्राहकांना लक्ष्य करणाऱ्या काही औषधांचा वापर केला असता मेंदूतील उतींना चालना मिळते व मेंदूतील ऑक्सिजनच्या पातळीतही फरक दिसून येतो.
जर्नल ऑफ न्यूरोसायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2013 रोजी प्रकाशित
मानवी वर्तन नियंत्रित करणारी ‘कळ’ सापडली
आपण विशिष्ट परिस्थितीत आपले वर्तन बदलतो, पण ते नेमके कसे घडून येते हे माहीत नव्हते, परंतु मेंदूत असलेल्या एका स्वीचच्या (कळ) माध्यमातून या वर्तनाचे नियंत्रण केले जाते, ही कळ वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. एली लीली व मिशिगन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी मेंदूतील अॅसिटिलकोलिन या न्यूरोट्रान्समीटरची पातळी मोजली असता त्यांना वर्तनाच्या नियंत्रणाचे गूढ उलगडले आहे.
First published on: 23-05-2013 at 12:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potential brain switch for changing behaviour found