देशाला महासत्ता करायचे असेल तर आधी सामान्य माणसांना सशक्त केले पाहिजे, त्यांच्या हाती सत्ता येईल अशा पद्धतीने सत्तेचे विकेंद्रीकरण केले तरच खरा विकास होईल असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष व युवानेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे केले. खासदार, आमदार आणि सरपंच ही सत्तेची उतरंड असली तरी या तिघांच्याही हाती खरी सत्ता नसतेच असे राहुल यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा काय असावा यासाठी राहुल सध्या देशभर जनतेशी संवाद साधत आहेत. याच उपक्रमांतर्गत राहुल यांनी शुक्रवारी येथील यात्री निवासात राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या देशभरातील ३०० समन्वयकांशी संवाद साधला. सत्तेचे विक्रेंद्रीकरण झाल्याविना खरा विकास होणार नाही. लोकप्रतिनिधींनाही काम करण्याचे समाधान मिळणार नाही. यापुढे त्यादृष्टीने प्रयत्न होतील. पक्षाचे घोषणापत्र तयार करताना समाजातील सर्व घटकांचे मत विचारात घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अशीही कैफियत
चारदा पालिकेत निवडून गेलो तरी वयाने व अनुभवाने लहान असलेल्या पक्षनेत्याकडे बायोडेटा न्यावा लागतो अशी कैफियत आंध्र प्रदेशातील एका समन्वयकाने मांडली. राहुल यांनीही अशा प्रकाराची कबुली देत बदलाचे आश्वास दिले.
’विविध निधींऐवजी एकच ग्रामसभा निधी असावा. ग्रामसभेत लोकांनी ठरविलेल्या कामांवर तो खर्च व्हावा
’ग्रामपंचायतीकडे थेट पैसा पोहोचायला हवा, खर्च करण्याचा अधिकार असावा. अनेक मंजुऱ्यांची कटकट नको
ग्रामपंचायत, पंचायत, जिल्हा परिषदांना अधिकार देण्याची मागणी होते, पण प्रत्यक्षात लोकसभेचा खासदारासही अधिकार असतात का, अशी शंका येते. कारण, पक्षनेतृत्व सांगेल तेच बटण खासदाराला लोकसभेतील मतदानाच्या वेळी दाबावे लागते.
राहुल गांधी, काँग्रेसचे उपाध्यक्ष़