राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवारपासून येथे राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेला सुरुवात होणार असून, त्यामध्ये दहशतवादविरोधी रणनीती आणि रोजगारनिर्मिती यावर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देशातील २३ राज्यपाल आणि दोन नायब राज्यपाल या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रपतींच्या सचिवालयातून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
दहशतवादी कारवाया आणि घूसखोरी या प्रश्नांना अनुसरून अंतर्गत आणि बाह्य़ सुरक्षा यावर परिषदेतील चर्चेत प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास कार्यक्रमावर विशेष लक्ष देऊन युवकांसाठी रोजगारनिर्मितीवरही चर्चा केली जाणार आहे.
स्वच्छ भारत अभियान, २०२२ पर्यंत सर्वाना निवारा आणि स्मार्ट सिटी यासह उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर परिषदेतील चर्चेत भर दिला जाणार आहे. मेक इन इंडिया कार्यक्रमाला गती देण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रपती भवनात होणारी ही राज्यपालांची ४७ वी परिषद आहे. या परिषदेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2016 रोजी प्रकाशित
दिल्लीत राज्यपालांची परिषद दहशतवादविरोधी रणनीतीवर चर्चा
दहशतवादविरोधी रणनीती आणि रोजगारनिर्मिती यावर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
First published on: 09-02-2016 at 02:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President of india to host two day governors conference in delhi