राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती भवन सोडण्याचे वेध लागले आहेत. त्यांनी नव्या बंगल्याचा शोध सुरू केला असून राष्ट्रपती भवनातील सामानाची आवराआवरही सुरू केली आहे. निवृत्तीनंतर प्रणव मुखर्जी यांना राहण्यासाठी बंगला शोधण्याची परवानगी राष्ट्रपतींच्या सचिव ओमिता पॉल यांनी कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांच्याकडे मागितली आहे. त्यांनीही बंगल्याचा शोधण्यास सुरूवात केली आहे.
२५ जुलै २०१७ रोजी प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपणार आहे. ते दुसऱ्यांदा या पदावर येण्याची शक्यता कमी आहे. माजी राष्ट्रपतींची सुरक्षा व इतर बाबी पाहता बंगला शोधण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे कॅबिनेट सचिव सिन्हा यांनी काही बंगल्यांची यादी बनवल्याचेही सांगितले जाते. राष्ट्रपतींसाठी नवे घर शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मुखर्जी यांचे काही सामान नव्या बंगल्यात तर काही त्यांच्या कोलकाता येथील घरी पाठवण्यात येणार आहे. मुखर्जी यांचे दिल्लीतील तालकटोरा मार्गावर एक घर आहे. तेथे त्यांनी सुमारे २० वर्ष वास्तव्य केले आहे. हे घर सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यांचे पश्चिम बंगालमधील सोनटुकरी (जगनीपूर) येथेही घर आहे. सन २००४ ते २०१२ या काळात ते या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.