नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप भरघोस मतांनी तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनातील समारोपाच्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, की आपल्याला जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांमध्ये परदेश दौऱ्यासाठी आमंत्रणे आली आहेत. त्यामुळे विदेशी लोकांनाही माहीत आहे की, ‘आयेगा तो मोदी ही..!’ 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभेत विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अनावधानाने केलेल्या टिप्पणीचा पुन्हा एकदा उल्लेख करताना भाजपला ३७० तर ‘एनडीए’ ४०० पेक्षा जास्त जागा मिळणार, असा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला. विरोधी पक्षाचे नेतेही ‘चारसो पार’चा नारा देत आहेत. २०१९ मध्ये ‘एनडीए’ने ३५० हून अधिक जागा जिंकल्या होत्या, आता यावेळी ४०० हून अधिक जागा जिंकू शकू. हा भाजपचा आतापर्यंतचा सर्वात निर्णायक विजय असेल, असे मोदी म्हणाले.  भाजपला लोकसभा निवडणुकीत विजयाची खात्री असली तरी, कार्यकर्त्यांनी पुढील १०० दिवस तनमनाने बुथस्तरावर काम केले पाहिजे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, प्रत्येक लाभार्थी-प्रत्येक समाजापर्यंत पोहोचा, त्यांचा विश्वास मिळवा, अशी सूचना सभागृहात उपस्थित असलेल्या सहा हजारहून अधिक पदाधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी केली.    देशात अद्याप लोकसभा निवडणुका झालेल्या नसताना नोव्हेंबरपासून मला विदेशातून बोलावणे येत आहे. याचा अर्थ २०२४च्या लोकसभेत भाजपच सत्ताधारी असेल, असा विश्वास विदेशातील मंडळींना आधीपासूनच वाटू लागला होता, असे मोदी म्हणाले. केंद्रातील ही सत्ता मला उपभोग घेण्यासाठी नको, तर मला देशासाठी काम करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा सत्ता मिळालीच आहे तर त्याचा आनंद लुटूया असे त्यांनी कधी म्हटले नाही. शिवरायांनी रयतेच्या कल्याणाचे लक्ष्य चालूच ठेवले. मीही सुखांचा उपभोग घेणारी व्यक्ती नाही. माझ्या विकासाला नव्हे तर, देशाच्या विकासाला मी प्राधान्य देतो. मी फक्त माझ्या घराचा विचार केला असता तर, कोटय़वधी लोकांसाठी घरे बांधणे मला शक्य झाले नसते, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>इंडिया आघाडीला आणखी एक धक्का, पंजाबमध्ये काँग्रेस-आप स्वतंत्रपणे लढणार, केजरीवाल म्हणाले “आमचे…”

राजकारण (राजनीती) नव्हे तर, राष्ट्रीय धोरणासाठी (राष्ट्रनिती) मी काम करत आहे. एका ज्येष्ठ नेत्याने मला सांगितले होते की मी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री म्हणून पुरेसे काम केले आहे. आता मी विश्रांती घ्यावी. पण, मी ‘राजनीती’ करत नाही तर, ‘राष्ट्रनिती’साठी कार्यरत राहिलो आहे, असे सांगत मोदींनी विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय ‘भारत मंडपम’मधील भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर ठेवले. काँग्रेसच्या काळात विकास खुंटल्याची टीका पंतप्रधानांनी यावेळी केली. संरक्षण दलांचे मानसिक खच्चीकरण हे काँग्रेसचे सर्वात मोठे पाप आहे. काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी ताकदीला दुय्यम मानल्याने देशाचे नुकसान झाले असा आरोपही त्यांनी केला.

‘महाभारता’सारखी स्थिती – शहा

नवी दिल्ली : कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आजच्या राजकारणाची तुलना ‘महाभारता’शी केली. महाभारतात ज्याप्रमाणे कौरव आणि पांडवांचे दोन गट होते, तसेच आताही ‘इंडिया आघाडी’ आणि ‘रालोआ’ हे दोन गट आहेत. रालोआमधील पक्ष राष्ट्राच्या हिताचे काम करत असताना विरोधी आघाडीतील सर्व पक्षांमध्ये केवळ घराणेशाही, भ्रष्टाचार आणि लांगुलचालन यालाच महत्त्व दिले जात असल्याचा आरोप शहा यांनी केला. पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून देण्याचे देशाच्या जनतेने निश्चित केले आहे, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा >>>“काँग्रेसमध्ये दोन गट, पक्ष हताश झाल्याने…”, मोदींची टीका; म्हणाले, “देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी…”

‘पुढील पाच वर्षे महत्त्वाची’

’विकसित भारत बनवायचा असेल तर देशासाठी पुढील पाच वर्षे महत्त्वाची आहेत. या काळात अधिक वेगाने विकासाची कामे केली जातील.

’रालोआ सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात विकासाला प्रचंड गती देण्यात आली. विकसित भारताकडे झेप घ्यायची असेल तर केंद्रात भाजपची सत्ता असणे गरजेचे आहे.

’प्रचंड बहुमताने भाजपला विजयी करा, असे आवाहन मोदींनी केले. युवा, महिला, गरीब आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला.

नड्डा यांना मुदतवाढ

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांना जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा मेमध्ये निकाल जाहीर होऊन नवे मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत पक्षाची सूत्रे नड्डा यांच्याकडे राहणार आहेत. २०१९ मध्ये नड्डा कार्यकारी अध्यक्ष झाले होते. २०२० मध्ये त्यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi expressed confidence about the upcoming lok sabha elections amy
First published on: 19-02-2024 at 00:28 IST