वी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पक्षाची सर्वात मोठी जनसंपर्क मोहीम मंगळवारपासून सुरू झाली. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ही महासंपर्क मोहीम राबवली जात असल्याची माहिती राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी राजस्थानातील अजमेर येथे जाहीर सभा घेतील. ही मोहीम ३० जूनपर्यंत राबवली जाईल.
आत्तापर्यंत भाजपने राबवलेल्या जनसंपर्क मोहिमेतील ही सर्वात मोठी मोहीम असून लोकसभेच्या ५४५ पैकी ५०० मतदारसंघांमध्ये पक्षाच्या वतीने सभा आयोजित केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये १ हजार मान्यवर कुटुंबांशी संपर्क केला जाईल. त्यामुळे सर्व मतदारसंघांमध्ये मिळून ५ लाख नामवंतांच्या कुटुंबांच्या भेटीगाठी घेतल्या जातील, असे चुग म्हणाले.

२०१९ मध्ये कमी मतांनी पराभव झालेल्या १३६ लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या वर्षभरापासून भाजपने जनसंपर्क वाढवण्याचे काम सुरू केले होते. दोन-तीन मतदारसंघांचा गट करून त्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली होती. या कामासाठी पक्षाने समन्वय समिती बनवली आहे. आता ५४५ लोकसभा मतदारसंघ १४४ गटांमध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक गटात दोन-तीन मतदारसंघ असतील. प्रत्येक गटाची जबाबदारी मंत्री व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिली जाणार असून प्रवासी लोकसभा मतदारसंघ मोहिमेप्रमाणे या मतदारसंघांमध्ये मंत्री-नेते आठ दिवस राहील, असे चुग म्हणाले.

सरकारच्या योजनांबाबत जनमताची चाचपणी

मंत्री-नेते प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये विविध समाजांशी संपर्क साधून केंद्रातील योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत की नाही, याची खात्री करून घेतील. मतदार भाजपला अनुकूल आहेत का, नसतील तर त्याची कारणे काय आहेत हे जाणून घेतले जाईल. केंद्रातील योजना लोकांपर्यत पोहोचल्या नसतील तर तिथे विशेष लक्ष दिले जाईल. या महाजनसंपर्क मोहिमेच्या अहवालानंतर लोकसभा निवडणुकीसाठी धोरणांची आखणी केली जाणार आहे, असेही चुग यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi meeting in rajasthan today amy
Show comments