पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी होणार आहे. मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. प्रकल्पाच्या नियोजनानुसार काम पूर्ण झाल्यास १५ ऑगस्ट २०२२ रोजी बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद नगरी सज्ज झाली आहे. मोदी गुरुवारी दुपारी अडीच वाजता, तर आबे दुपारी तीन वाजता अहमदाबाद पोहोचतील. विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंत ते रोड शो करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रोड शोचा मार्ग सात किलोमीटरचा असून या मार्गावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प निश्चित कालावधीत पूर्ण झाल्यास १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशातील पहिली बुलेट ट्रेन धावेल. १ लाख ८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जपानचे कर्जसहाय्य घेण्यात आले आहे. जपानकडून भारताला ०.१ टक्के दराने ८८ हजार कोटींचे कर्ज देण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्यास मोदींनी १५ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे, असे मानले जाते.

बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये:

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन किमान ३२० किलोमीटर प्रतितास आणि कमाल ३५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावेल.

या मार्गावर १२ स्थानके असतील. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती.

बुलेट ट्रेनचा मार्ग ५०८ किलोमीटरचा आहे. ४६८ किलोमीटर उन्नत मार्ग असणार आहे. समुद्रात तयार करण्यात आलेल्या बोगद्यातूनही बुलेट ट्रेन धावणार आहे. ही बुलेट ट्रेन किमान २ तर कमाल ३ तासांत हे अंतर पार करणार आहे.

या ट्रेनचे प्रवासी भाडे अजून निश्चित व्हायचे आहे. ते अंदाजे २७०० ते ३००० रुपये असेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपात अंदाजे १० ते १५ लाख जणांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.