फडणवीस-पंकजांवर पंतप्रधान कार्यालयाची नाराजी

‘ट्विटर ही काय जाहीररीत्या भांडण्याची जागा आहे का? पण महाराष्ट्रामध्ये तसे घडले आहे..’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील ट्विटरवरील शेरेबाजीबाबत ही नाराजीची प्रतिक्रिया आहे पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीची.

पंतप्रधान कार्यालय जरी ‘साऊथ ब्लॉक’मध्ये असले तरी या महत्त्वाच्या व्यक्तीचे आणखी एक कार्यालय समोरच्या ‘नॉर्थ ब्लॉक’मध्ये आहे. काश्मीरमध्ये चिघळलेल्या परिस्थितीसंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्राचा त्यांना तत्काळ संदर्भ हवा होता. तेव्हा त्या एका पत्रकाराने सोनियांच्या पत्राची मुळप्रत त्यांना विनाविलंब पाठवताच ते म्हणाले, ‘अलीकडे मुळप्रतींचे प्रस्थ खूपच वाढले आहे. सर्व काही समाज माध्यमांवरून सुरू आहे. आता बघा ना, महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये भांडणसुद्धा ट्विटरवर झाले. पण ट्विटर ही काय जाहीररीत्या भांडणाची जागा आहे? कधी कधी सोशल मीडियाच्या अतिपणाची भीतीच वाटते..’

त्या महत्त्वाच्या व्यक्तीने फडणवीस व मुंडे यांच्यातील ट्विटरवादाबाबत आणखी काही भाष्य केले नाही; पण राजधानीमध्ये तो दिवसभर चर्चेचा विषय बनला होता. जलसंधारण खाते काढून घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सिंगापूर येथे असूनही तेथील जागतिक जल परिषेदत सहभागी होण्यास नकार दिला होता. तसे ट्विटरवरून जाहीर केले होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांनीही त्यांना ट्विटरवरूनच ‘वरिष्ठ मंत्री’ या नात्याने ‘महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी’ म्हणून सहभागी होण्याचे आदेश दिले होते.