मुंबई हल्ल्यासंदर्भातील खटल्याचे कामकाज निर्णायक टप्प्यावर आले असतानाच या खटल्यातील सरकारी वकील झुल्फीजार अली यांची शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी अत्यंत जवळून गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे अली हे बेनझीर भुत्तो यांच्या हत्याकटासंदर्भातील खटल्यातही सक्रिय होते.
झुल्फीजार अली शुक्रवारी सकाळी कारने रावळपिंडी येथील न्यायालयात जात असताना कराचीतील गजबजलेल्या बाजार परिसरात त्यांच्या गाडीवर हल्लेखोरांनी हल्ला केला. अत्यंत जवळून त्यांनी अली व त्यांचा अंगरक्षक फर्मान अली यांच्यावर गोळ्या झाडल्या. अली यांच्या चेहऱ्यावर व छातीत गोळ्या घुसल्याने त्यांचा कारवरील ताबा सुटला व त्यामुळे धडकेत एक महिला ठार झाली. गर्दीचा फायदा घेत हल्लेखोर पसार झाले. अली यांना येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर त्यांची प्राणज्योत मालवली होती. अंगरक्षक फर्मान अली जबर जखमी झाला आहे.
अली कोण होते?
झुल्फीझार अली हे पाकिस्तानच्या केंद्रीय तपास संस्थेचे वकील होते. त्यांच्यावर मुंबई हल्ल्याच्या खटल्याची तसेच बेनझीर यांच्या हत्याकटाच्या खटल्याची अशी दुहेरी जबाबदारी होती. ही जबाबदारी ते अत्यंत निष्ठेने निभावत होते.



