scorecardresearch

शिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ

आरोपी शिक्षक सध्या फरार आहे. दरम्यान, घटनेपूर्वी पीडित मुलगा किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे

शिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ
(फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)

Dalit Boy Death: उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात शिक्षकाने केलेल्या मारहाणीत १५ वर्षीय दलित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेविरोधात औरैया जिल्ह्यात हिंसक आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या दोन गाड्या पेटवून दिल्या आहेत. तर दोन खाजगी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक केल्याचेही वृत्त आहे. या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस दल जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहे.

Ankita Bhandari Murder : “…तर आरोपींना आमच्या घरासमोर जिवंत जाळा”, अकिंताच्या आईची सरकारकडे मागणी

आरोपी शिक्षकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८, ३२३, ५०४ आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती कानपूर झोनचे अतिरिक्त महासंचालक भानू भास्कर यांनी दिली आहे. घटनेपूर्वी पीडित मुलगा किडनीच्या आजाराने ग्रस्त होता. या आजारावर लखनऊतील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. याबाबत पीडित मुलाचे कुटुंबीय आणि रुग्णालयाकडून पोलीस पडताळणी करत आहेत.

Ankita Bhandari Murder : माजी भाजपा नेत्याकडून मुलाची पाठराखण; म्हणाले, “साधा, सरळ…”

परीक्षेत चुकीची उत्तरं लिहिल्यावरुन पीडित मुलाला शिक्षकाने ७ सप्टेंबरला मारहाण केली होती. याविरोधात वडिलांच्या तक्रारीनंतर २४ सप्टेंबरला एफआयआर दाखल करण्यात आली होती. परीक्षेत एका प्रश्नाचे उत्तर चुकीचे लिहिल्यानंतर शिक्षकाने काठीने मारहाण केली, असा आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केला आहे. या मारहाणीनंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिक्षकाने मुलाच्या उपचाराचा पूर्ण खर्च देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आरोपीने केवळ ४० हजारच दिले. उर्वरित पैशांची मागणी केल्यानंतर आरोपीने जातीवाचक शिविगाळ केली, असा आरोप मृत मुलाच्या वडिलांनी केला आहे. लखनऊतील एका रुग्णालयात या मुलावर दोन आठवड्यांपासून उपचार सुरू होते. अखेर या मुलाची सोमवारी सकाळी मृत्यूशी झुंज संपली. इटावामधील डॉक्टराच्या पथकाकडून करण्यात आलेल्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या