पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार ठार

सीआरपीएफचे जम्मू आणि काश्मीरमधील महानिरीक्षक जुल्फिकार हसन यांनी मात्र हा पुलवामा हल्ल्याचा सूम्ड नाही, असे स्पष्ट केले.

(संग्रहित छायाचित्र)

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार मुदस्सर अहमद खान हा दक्षिण काश्मिरात त्राल येथे सुरू असलेल्या चकमकीत सोमवारी मारला गेला. मुदस्सर जैश ए महम्मदचा दहशतवादी होता. त्याच्याबरोबर असलेला दुसरा अतिरेकीही ठार झाला असून तो पाकिस्तानी असल्याचा संशय आहे.

सुटी संपवून सेवेत परतत असलेल्या ‘सीआरपीएफ’ जवानांच्या ताफ्यावर पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला भीषण हल्ला झाला होता. या हल्ल्याने देशांतर्गत वातावरण तर ढवळून निघालेच, पण जगभरातही शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटली होती.

त्राल भागात अतिरेकी लपल्याची खबर आल्यावरून कारवाई सुरू होती. त्यावेळी रविवारी सायंकाळी मुदस्सर अहमद खान आणि त्याच्या बरोबर असलेल्या अतिरेक्याने जवानांवर गोळीबार सुरू केला होता. त्यानंतर सुरू झालेली चकमक सोमवापर्यंत चालू होती. यात या दोन्ही अतिरेक्यांना टिपून काढण्यात सुरक्षा दलांना यश आले.

सीआरपीएफचे जम्मू आणि काश्मीरमधील महानिरीक्षक जुल्फिकार हसन यांनी मात्र हा पुलवामा हल्ल्याचा सूम्ड नाही, असे स्पष्ट केले. आम्ही शांततेला प्राधान्य देतो आणि देशाविरोधात कुणीही हाती शस्त्र घेऊ नये, असे मानतो, असे ते म्हणाले. मुदस्सर जिथे दडून बसला होता त्या जागी काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. ते पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आले आहेत.

सूत्रधार..

* मुदस्सर हा २३ वर्षांचा असून तो इलेक्ट्रेशियनचे काम करीत होता. ‘आयटीआय’मधून इलेक्ट्रशियनचा वर्षभराचा पदविका अभ्यासक्रम तो उत्तीर्ण झाला होता.

* पुलवामातील त्रालच्या मिर मोहल्ल्यात त्याचे घर होते. २०१७मध्ये त्याने जैश ए महम्मदमध्ये शिरकाव केला होता. त्यानेच स्फोटातील गाडी आणि स्फोटके यांची जमवाजमव केली होती.

* नूर महम्मद तंतरी ऊर्फ नूर त्राली याने काश्मीर खोऱ्यात जैश ए महम्मद पुनरूज्जीवित केली आहे. त्यानेच मुदस्सरला या दहशतवादी गटात सामील करून घेतले होते.

* डिसेंबर २०१७मध्ये तंत्री मारला गेला तेव्हापासून म्हणजे १४ जानेवारी २०१८ पासून मुदस्सर घरातून गायब होता.

* पुलवामा हल्ल्यानंतर २७ फेब्रुवारीला त्याच्या घराची ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने झडती घेतली होती.

मुदस्सरचे तातडीने दफन..

सूत्रधार मुदस्सरचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांनी ताब्यात घेतला. इतकेच नव्हे, तर त्याचा दफनविधीही तातडीने पार पडला आहे, असे सांगण्यात आले.

१८ अतिरेकी ठार.. लेफ्टनंट जनरल धिल्लाँ यांनी सांगितले की, पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलांच्या धडक कारवाईदरम्यान विविध चकमकींत १८ अतिरेकी मारले गेले आहेत.

दुसरा अतिरेकी पाकचा?

दुसरा मृत अतिरेकी जैश ए महम्मदचा सज्जाद भट असावा, असा तर्क होता. भटचीच मोटार या हल्ल्यात वापरली गेली होती. मात्र या अतिरेक्याचा चेहरा या चकमकीत इतका ओळखण्यापलीकडे गेला होता की भटच्या आप्तांनी त्या मृतदेहाचा स्वीकार करण्यास नकार दिला. हा अतिरेकी पाकिस्तानी असावा, असा तर्क आहे. त्याचे सांकेतिक नाव खलिद असल्याचे जवानांना समजले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pulwama attack chief killed

ताज्या बातम्या