Pulwama Terrorist Attack: जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवल्याची माहिती समोर येत आहे.

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे सीआरपीएफचा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला जात होता. या ताफ्यात २५ बस होत्या. सुमारे अडीच हजार जवान या ताफ्यात होते.  अवंतीपोरा येथे महामार्गावर स्फोटाने भरलेल्या कारने दोन बसला धडक दिली. या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हल्ल्याच्या काही वेळानंतरच पाकिस्तानमधील जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल हा २०१६ नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. बुरहान वानी या दहशतवाद्याला २०१६ सैन्याने कंठस्नान घातले होते. त्याच्या मृत्यूनंतर जम्मू- काश्मीरमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारानंतर स्थानिक तरुणांचे दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे प्रमाण वाढले होते. आदिल दार हा देखील याच सुमारास दहशतवादी संघटनेत सामील झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या तीन वर्षांमधील उरीनंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये उरी येथे लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते.

वाचा: काश्मीरमध्ये CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १८ जवान शहीद

वाचा: उरीनंतरचा हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला

हल्ल्यानंतर सोशल मीडियावर आदिलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आदिलने ‘लवकरच विजय मिळणार, इन्शा अल्लाह!’, असे म्हटले आहे. आदिल हा पुलवामा येथील रहिवासी असल्याचे समजते.