अमेरिकेत प्रथमच भारतीय कंपन्यांच्या विडय़ा विकण्यावर बंदी घालण्यात आली असून निकषांचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्याची जॅश इंटरनॅशनल यांनी उत्पादित केलेल्या सूत्र विडी रेड, सूत्र विडीज मेंथॉल, सूत्र विडीज रेड कोन व सूत्र विडीज मेंथॉल कोन ही उत्पादने व्यावसायिक तंबाखूजन्य उत्पादनांइतकी योग्य आढळून आली नाहीत.
२००९ च्या  कौटुंबिक धूम्रपान प्रतिबंध व तंबाखू नियंत्रण कायद्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. या निर्णयानुसार आता अमेरिकेत या कंपनीकडून आयात करण्यात आलेल्या विडय़ा वापरता येणार नाहीत. कोणती तंबाखू उत्पादने विकली जावीत यावर पूर्वी कुणाचे नियंत्रण नव्हत़े  पण तंबाखू नियंत्रण कायद्यामुळे कोणती नवीन तंबाखूजन्य उत्पादने येत आहेत व ती लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहेत याचाही विचार आता अन्न व औषध प्रशासनाकडून केला जातो.
या कायद्यानुसार नियंत्रकांनी म्हटले आहे की, जॅश इंरनॅशनलची उत्पादने योग्य दर्जाची नाहीत़  शिवाय कंपनी नवीन उत्पादनांवर घटकांची व त्यांच्या गुणधर्माची माहिती देत नाही. कंपन्यांनी नियमांचे पालन केले पाहिजे असे अन्न व औषध प्रशासनाच्या तंबाखू उत्पादने विभागाचे संचालक मिश झेलर यांनी सांगितले.