गेल्या दोन महिन्यांपासून पंजाबमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा आता दुसरा अंक सुरू होण्याच्या तयारीत आहे. कारण कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा आणि नंतर दुसऱ्या पक्षाची स्थापना या घडामोडी स्थिर होत असताना दुसरीकडे अजून काँग्रेसमध्येच असलेल्या त्यांच्या पत्नी आणि खासदार परनीत कौर या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसनं परनीत कौर यांना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याभोवती पंजाबमधील राजकीय घडामोडी फिरू लागल्या आहेत.

पक्षश्रेष्ठी आणि पंजाबमधील प्रदेश नेतृत्वासोबत झालेल्या पराकोटीच्या मतभेदांनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाचा आणि पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अमरिंदर सिंग भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय जाहीर केला. यादरम्यान त्यांचे मतभेद असलेल्या नवजोत सिंग सिद्धू यांनी देखील आधी नवे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्यासोबत वाद आणि नंतर समेट देखील घडवून घेतला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमध्ये राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला होता.

हे वातावरण आत्ता कुठे स्थिर होऊ लागलेलं असतानाच आता काँग्रेसनं कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि पतियाला मतदारसंघातील काँग्रेस खासदार परनीत कौर यांना नोटीस पाठवली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांच्या पतीनं पक्षाला रामराम ठोकल्याच्या निर्णयावर देखील त्यांची भूमिका पक्षानं मागवली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर पक्ष न सोडण्यावर ठाम; म्हणाल्या, “मी काँग्रेस…”!

“गेल्या काही दिवसांपासून आम्हाला सातत्याने काँग्रेस कार्यकर्ते, आमदार, नेते, पदाधिकाऱ्यांकडून तुमच्या पक्षविरोधी कारवायांविषयी माहिती मिळत आहे. तुमचे पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडून ‘पंजाब लोक काँग्रेस’ हा स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यापासून या प्रकारच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तुम्ही जाहीरपणे तुमच्या पतीच्या पक्षाच्या बाजूने भूमिका मांडल्याचं देखील आमच्यापर्यंत आलं आहे. त्यामुळे कृपया या मुद्द्यावर येत्या सात दिवसांमध्ये तुमची भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा पक्षाला योग्य ती कारवाई करावी लागेल”, असे निर्देश देणारी नोटीस काँग्रेसचे पंजब प्रभारी हरीश चौधरी यांनी परनीत कौर यांना पाठवली आहे.