गरिबी ही एक मानसिकता असल्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य बघता राहुल यांना अजूनही भारत आणि भारताचे लोक यांची मानसिकता काय आहे, हे समजून घेण्याची नितांत गरज आहे, असे मत शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख व पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी येथे व्यक्त केले.
गरिबी ही एक मानसिक ठेवण असून अन्न, पैसा किंवा अन्य वस्तू यांची कमतरता म्हणजे गरिबी नव्हे, असे मत राहुल गांधी यांनी सोमवारी अलाहाबाद येथे एका चर्चासत्रात व्यक्त केले होते. तुम्ही आपल्या मनात आत्मविश्वास जागृत केला, की कोणालाही गरिबी दूर करता येईल, असेही राहुल तेव्हा म्हणाले होते.
राहुल गांधी यांचे हे वक्तव्य बघितले असता भारत आणि भारतीय लोकांबद्दल त्यांची काय मानसिकता आहे, याचेच प्रतिबिंब त्यामधून दिसते, अशी टीका बादल यांनी केली. समाजातील पददलितांच्या आशाआकांक्षा असतात आणि आपल्या आयुष्यात प्रगती व्हावी, असे त्यांनाही वाटत असते. या पाश्र्वभूमीवर राहुल गांधी यांना या लोकांच्या भावनांची जाणीव होत नाही हेच आश्चर्यकारक आहे.
स्वातंत्र्यापासून काँग्रेसने अंगीकारलेल्या भ्रष्ट धोरणांमुळेच देशाला अजूनही गरिबीचा सामना करावा लागत आहे, असा आरोप बादल यांनी केला.