आम्ही विरोधकांचाही आदर करतो, असे सांगत भाजपावर निशाणा साधणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर भाजपाने पलटवार केला आहे. राहुल गांधी भाजपाला सल्ला देत आहेत. पण त्यांनी आधी प्रणव मुखर्जी आणि पी व्ही नरसिंहराव यांच्यासारख्या नेत्यांचा काँग्रेसने आदर केला का? याच उत्तर द्यावे, असे आव्हानच भाजपाने राहुल गांधींना दिले आहे.

मुंबईतील सभेत राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. काँग्रेस पक्षच देशाला वाचवू शकतो हे सांगताना राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसने नेहमीच अटलबिहारी वाजपेयी सरकारविरोधात लढा दिला. पण, वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण पहिली भेट दिली. ही काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे. आम्ही विरोधकांचाही आदर करतो, असे राहुल गांधीनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या विधानानंतर भाजपाने पलटवार केला आहे.

भाजपाचे नेते अनिल बलुनी यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी हे भाजपाला वरिष्ठ नेत्यांचा आदर करण्याचा सल्ला देत आहेत. पण आधी त्यांनी पी व्ही नरसिंहराव, प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसकडून कशी वागणूक देण्यात आली, पक्षाने या नेत्यांचा आदर केला का, याचे उत्तर द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी मुंबईतील सभेत लालकृष्ण अडवाणी यांचा देखील उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू धर्माबद्दल बोलतात. हिंदू धर्मात गुरूपेक्षा कोणीही मोठा होऊच शकत नाही. मोदी यांचे गुरू लालकृष्ण अडवाणी असून त्यांचा मानसन्मान मोदी नव्हे, तर काँग्रेस पक्ष ठेवतो, असे त्यांनी सांगितले.