Rahul Gandhi Slammed By Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या कामकाजावर टीका करणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, लोकसभेत बोलण्यासाठी त्यांना जेव्हा वेळ दिली होती, तेव्हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते व्हिएतनाममध्ये होते. यावेळी त्यांनी कर्नाटकात काँग्रेस सरकारने मुस्लिमांसाठी जाहीर केलेले चार टक्के आरक्षण म्हणजे “लॉलीपॉप” असल्याचेही म्हटले.
“धर्माच्या आधारावर देण्यात येणारे कोणत्याही प्रकारचे आरक्षण हे संविधानाचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे न्यायालये ते रद्द करतील. धर्माच्या आधारावर देण्यात येणाऱ्या आरक्षणाला आमचा विरोध आहे”, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
मनमानी चालत नाही
संसदेच्या कामकाजावर राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “सभागृहात बोलण्याचे काही नियम आहेत जे, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याला कदाचित माहित नसतील. जे मनमानी पद्धतीने पाळता येत नाहीत.” दरम्यान टाईम्स नाऊ समिटमध्ये बोलताना अमित शाह यांनी हे विधान केले.
…तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, “त्यांना अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलण्यासाठी ४२ टक्के वेळ देण्यात आला होता. आता कोण बोलणार हे त्यांनी ठरवायचे आहे. पण, जेव्हा संसदेत गंभीर चर्चा सुरू होती तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते आणि जेव्हा ते परतले तेव्हा त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार बोलण्याचा आग्रह धरला.”
यावेळी अमित शाह यांनी, “संसद नियमांनुसार चालते, काँग्रेस पक्षाप्रमाणे नाही, जो एका कुटुंबाद्वारे चालवला जातो. जिथे तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा बोलू शकता”, अशीही टीका केली.
राहुल गांधींचे आरोप
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की,, “सभागृहात जेव्हा विरोधी पक्षनेता उभा राहतो, तेव्हा त्याला बोलू दिले पाहिजे, असे संकेत आहेत. मी जेव्हा सभागृहात उभा राहतो, तेव्हा मला बोलू दिले जात नाही. कशा पद्धतीने सभागृहाचे कामकाज सुरू आहे, हे मला कळत नाही. आम्ही जे बोलू इच्छितो, ते बोलू दिले जात नाही. मागच्या सात-आठ दिवसांपासून मला बोलूच दिलेले नाही. सभागृह अशाप्रकारे चालू शकत नाही. लोकशाहीमध्ये सरकार आणि विरोधक या दोघांचीही स्वतःचे एक स्थान असते. पण इथे विरोधकांचे काहीच स्थान नाही. इथे फक्त सरकारच दिसते.”