तेवीस वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याच्या आरोपावरून राजस्थान सरकारने बी. बी. मोहंती या आयएएस दर्जाच्या अधिका-याला निलंबित केले. पोलिसांकडून मिळालेल्या अहवालानंतर राजस्थानातील नागरी सेवा लवादाचे अध्यक्ष असणा-या मोहंती यांना निलंबित करण्याचा निर्णय राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी घेतला. यापूर्वी बुधवारी मोहंती यांना पोलिस आयुक्तांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर सोमवारी पोलिसांचे पथक मोहंती यांना शोधण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता ते घरी सापडले नाहीत. अतिरिक्त मुख्य सचिव पदावर अधिकारी असणा-या मोहंती यांच्यावर एमबीएची विद्यार्थीनी असलेल्या पीडित युवतीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसेच संबधित युवतीने आपला जबाब दंडाधिका-यांसमोर नोंदविला आहे. पीडित युवतीने पोलिसांवर मोहंती यांच्यावरील कारवाईला उशीर केल्याचा आरोप करीत याप्रकरणी सीबीआयकडून तपास करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. महेशनगर पोलिस ठाण्यात २५ जानेवारी रोजी पीडित युवतीकडून तक्रार दाखल केली गेल्यापासून आयएएस अधिकारी मोहंती बेपत्ता आहेत.