राजस्थानच्या कोटामध्ये बलात्काराचा आरोप असलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला दूरच्या नातेवाईकांनी कथितरीत्या बांधून, मारहाण करून, मूत्र पिण्यास भाग पाडून त्याला लुटल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तरुणावर बलात्काराचा आरोप

माहितीनुसार, ही घटना १४ सप्टेंबर रोजी घडली. दोन दिवसांनंतर तरुणाच्या दूरच्या नातेवाईकांनी म्हणजेच काका-काकूंनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी दावा केला आहे की, या २२ वर्षीय तरुणाने त्यांच्या घरात घुसून महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर आता त्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

संबंधित तरुणाच्या मोठ्या भावाने मात्र याप्रकरणी एक वेगळीच गोष्ट सांगितली आहे. त्याने असा दावा केला आहे की, १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी कोटा जिल्ह्यातील जगपुरा गावात या तरुणाला त्याच्या दूरच्या नातेवाईकांनी त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं. यानंतर त्यांनी त्याचे हात -पाय बांधले आणि रात्रभर ओलीस ठेवलं.

मोबाईल फोन आणि पैसेही हिसकावले

युवकाचा मोठा भाऊ असंही म्हणाला की, नातेवाईकांनी यावेळी त्याचा मोबाईल फोन, ओळखपत्र आणि २२ हजार रुपये देखील त्यांच्याकडून हिसकावून घेतले. इतकेच नव्हे तर कथितरित्या त्याला मारहाण केली आणि मूत्र पिण्यास देखील भाग पाडलं. या तरुणाच्या भावाने पुढे सांगितलं की, काकू आणि काकांनी कथित मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि चुकून तो ऑनलाईन अपलोड झाला.

पोलिस उपअधीक्षक प्रवीण जैन यांनी याविषयी बोलताना असं सांगितलं आहे की, आता समोर आलेल्या व्हिडिओच्या आधारे या जोडप्यावर आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल.