आपण सत्तेत आहोत आणि लोकांबाबत आपली काही जबाबदारी आहे, याचे भान ठेवून मंत्र्यांनी वक्तव्ये करावीत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केले. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग आणि किरण रिजिजू यांनी दलित व उत्तर भारतीयांबाबत अलीकडेच उधळलेल्या मुक्ताफळांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आपण तसे बोललोच नव्हतो किंवा आपल्या बोलण्याचा तसा हेतू नव्हता, अशी सारवासारव या मंत्र्यांना करता येणार नाही. त्यामुळे कोणतेही वक्तव्य करताना आपण जागरूक असले पाहिजे, असे सिंह म्हणाले. फरिदाबाद येथे दलित कुटुंबाच्या जळितकांडात दोन लहान मुलांचा मृत्यू ओढवला. त्यावर कुणी कुत्र्यावर दगड मारला तर त्यात सरकारचा काय दोष, अशी संवेदनाशून्य प्रतिक्रिया केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी दिली होती. तर, उत्तर भारतीयांना कायदे मोडण्यात अभिमान आणि आनंद वाटतो, असे वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री रिजिजू यांनी केले होते. राजनाथ सिंह यांनी या दोघांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे.

भाजपमध्ये अस्वस्थता

व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्याचे प्रतिकूल पडसाद बिहार निवडणुकीच्या मतदानात उमटण्याच्या धास्तीने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. बिहार निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या हिंदुस्तानी अवामी मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांनीही सिंग यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे. भाजपने हरयाणात आधी दलितहत्या थांबवून तेथे मंगलराज आणावे, असा टोला नितीश कुमार यांनी हाणला आहे.