Rapido Driver : रॅपिडो या बाईक टॅक्सी चालकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रॅपिडो बाईक टॅक्सी चालकाने एका महिलेला मारहाण केली आहे. जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्या व्हिडीओत रॅपिडो चालक महिलेच्या कानशिलात लगावताना दिसतो आहे. ही महिला त्याच्याशी इंग्रजीत बोलते आहे तर तो चालक तिच्याशी कन्नड भाषेत बोलतो आहे. हा व्हिडीओ बंगळुरुचा आहे. बंगळुरुतील जया नगर भागातला हा व्हिडीओ आहे.
नेमकं काय घडलं? व्हिडीओत काय दिसतंय?
एक महिला रॅपिडो चालकाशी वाद घालताना दिसते आहे. या वादात शेवटी रॅपिडो चालक तिला कानशिलात लगावतो. ती महिला इंग्रजीत बोलताना दिसते आहे तर चालक कन्नड भाषेत बोलतो आहे. तू गाडी नीट चालवली नाही असं ती महिला सांगते आहे. तिने या चालकाला हेल्मेट परत केलं आणि पैसे देणार नाही सांगितलं. ज्यानंतर चालक चिडतो आणि महिलेला कानशिलात लगावतो हे दिसतं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
लोक या व्हिडीओवर व्यक्त होत आहेत
निकेश सिंग या पत्रकाराने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओबाबत नेटकरी व्यक्त होत आहेत. एका महिलेला मारहाण होते आहे बाकी कणा नसलेले लोक शांतपणे बघत उभे आहेत असं दीपांजन यांनी म्हटलं आहे. बंगळुरुत राहणाऱ्या लोकांना असा रॅपिडोच्या चालकांकडून मार खावा लागतो आहे. ज्यांना इंग्रजी येत नाही ज्यांना फक्त कन्नड भाषा येते असे लोक महिलांना मारहाण करत आहेत असं एका युजरने म्हटलं आहे. महिलेला मारहाण करणाऱ्या या चालकाची मानसिकता काय ते समजतं आहे असं दुसऱ्या एकाने म्हटलं आहे.
महिलेची पोलिसात तक्रार
या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. पोलीस आता या चालकाचा शोध घेत आहेत. लवकरच कर्नाटकातल्या रस्त्यांवर अशा प्रकारच्या बाईक टॅक्सी दिसणार नाहीत. कारण कर्नाटक उच्च न्यायालयानेच त्या संदर्भातले आदेश दिले आहेत. एप्रिल महिन्यातच कर्नाटक उच्च न्यायालयाने बाईक टॅक्सी बंद करा असे आदेश दिले आहेत. बाईक टॅक्सी म्हणजे व्यावसायिक वाहनं नाहीत त्यामुळे ती तातडीने बंद करावीत असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. या प्रकरणी सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. आता कोर्टाने आदेश देऊन बारा आठवडे उलटले आहेत. आता न्यायालयाच्या नियमाप्रमाणे या बाईक टॅक्सी बंद झाल्या पाहिजेत अशी मागणी या प्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी केली आहे.