नवी दिल्ली : बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सुरू असलेले राजकीय तणाव व संयुक्त दनता दलाच्या भाजपची साथ सोडण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री पशुपतिकुमार पारस यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा अन्य कोणी चांगला नेता मिळणे अशक्य असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या पक्षाचे लोकसभेत पाच खासदार आहेत.
आपल्या पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर पार यांनी सांगितले, की आमचा पक्ष भाजपसोबत शंभर टक्के आहे. पक्षाच्या बैठकीत भाजपलाच पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि दिग्गज दलित नेते रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये भाजपशी आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर आपला पक्ष ठाम राहणार आहे.
दिवंगत रामविलास पासवान यांचे छोटे बंधू पारस पासवान यांच्या या पक्षाचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण त्यांनी रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांच्या नेतृत्वाच्या विरोधात जात लोकजनशक्ती पक्ष फोडला होता. पारस पासवान यांना नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचा पाठिंबा होता. कारण, २०२० मध्ये संयुक्त जनता दलाविरुद्ध चिराग पासवान यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभे केल्याने चिराग यांच्यावर नितीशकुमार नाराज होते. या पार्श्वभूमीवर पारस यांचा निर्णय नितीशकुमार यांच्या विरोधात जाणारा आहे. त्यांनी सांगितले, की मोदींचे नेतृत्व ही देशाची सध्याची गरज आहे. त्यांच्यासारखा नेता सध्या मिळणे अशक्य आहे. मी जोपर्यंत राजकारणात असेन, तोपर्यंत ‘एनडीए’सोबतच असेन.