जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले म्हणून आगपाखड करणाऱ्या पाकिस्तानला भारताने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीर हा संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असून त्यामध्ये तुमची ढवळाढवळ नको असे भारताने पाकिस्तानला सुनावले आहे. कलम ३७० रद्द करण्यावरुन सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत. तो संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे असे भारताने स्पष्ट केले आहे.

भारताने पाकिस्तानला व्यापारी संबंध तोडण्याच्या आणि राजनैतिक संबंधांचा स्तर घटवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितले आहे. भारतासोबत असणाऱ्या द्विपक्षीय संबंधांबाबत पाकिस्तानने काही एकतर्फी निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानच्या या निर्णयामागे दोन्ही देशांचे संबंध धोकादायक वळणावर पोहोचल्याचे पाकिस्तानला जगाला दाखवून द्यायचे आहे असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

कलम ३७० रद्द करण्यासंबंधी ज्या काही घडामोडी घडत आहेत. तो संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे. काश्मीरमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र निर्माण करुन अन्य देशांना हस्तक्षेप करायला लावण्याची पाकिस्तानची जी भूमिका आहे. त्यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत सरकार आणि संसदेने काश्मीरसंबंधी घेतलेल्या निर्णयांमागे जम्मू-काश्मीरमध्ये विकासाची संधी निर्माण करण्याचा हेतू आहे. संविधानातल्या तात्पुरत्या तरतुदींमुळे ही संधी नाकारली जात होती.