सन १९९९ मध्ये पाकिस्तानने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीबद्दल तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी आयएसआय या संघटनेलाही अंधारात ठेवले होते, असा दावा पाकिस्तानचे निवृत्त लष्करप्रमुख शहीद अझीझ यांनी आपल्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात केला आहे. इतकेच नाही तर भारतीय लष्कराचे काही संदेश पकडल्यानंतर त्यातूनच आयएसआयला या घुसखोरीबद्दल माहिती मिळाल्याचे अजब विधानही त्यांनी केले आहे.
कारगिल युद्धादरम्यान, लेफ्ट. जन. शाहीद अझीझ हे पाकिस्तानच्या इंटर सव्‍‌र्हिसेस इंटिलिजन्सच्या पृथ:करण विभागात काम करीत होते. ३ आणि ४ मे १९९९ रोजी त्यांनी बिनतारी यंत्रणेद्वारे पाठविले गेलेले, भारतीय लष्कराचे काही संदेश तत्कालीन आयएसआय प्रमुख झियाउद्दीन भट यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यातून कारगिलमधील पाकिस्तानच्या घुसखोरीची माहिती आयएसआयला मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गेल्याच आठवडय़ात प्रकाशित झालेल्या लेफ्ट. जन. अझीझ यांच्या ‘फॉर हाऊ लाँग धिस सायलेन्स’ या पुस्तकात त्यांनी, कारगिल येथील घुसखोरीची संपूर्ण आखणी परवेझ मुशर्रफ  आणि अन्य तीन लष्करी अधिकाऱ्यांनी केली आहे, असा दावा केला आहे. तसेच या चौघांव्यतिरिक्त एकाही व्यक्तीस याची माहिती नसल्याचेही शाहीद अझीझ यांनी नमूद केले आहे.