दिल्लीत पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता
 नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली. कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्याने दिल्ली नव्याने निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. केजरीवाल यांनी पक्ष नेत्यांसह पक्षाची भूमिका राज्यपालांकडे स्पष्ट केली. त्यापूर्वी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसने विधानसभा विसर्जित करून तातडीने निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. भाजपनेदेखील पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्यास तयार आहोत असे राज्यपालांकडे स्पष्ट केले. झारखंड व जम्मू काश्मीर विधानसभेसोबत दिल्ली विधानसभेच्या निवडणुका घ्या अशी विनंती राज्यपालांकडे केल्याचे काँग्रेस नेते हरून युसुफ यांनी स्पष्ट केले. भाजप निवडणुकीसाठी तयार असल्याचे पक्षाचे दिल्लीचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी स्पष्ट केले.

जद(यू)च्या चार अपात्र आमदारांची न्यायालयात धाव
पाटणा:बिहार विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतलेल्या अपात्रतेच्या निर्णयाला जद(यू)च्या चार आमदारांनी पाटणा उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ग्यानेंद्रसिंग ग्यानू, नीरजसिंग बबलू, रवींद्र राय आणि राहुल शर्मा या जद(यू)च्या चार आमदारांना पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवून अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी अपात्र ठरविले होते. या आमदारांच्या वतीने एस. के. मंगलम यांनी याचिका दाखल केली आहे. चौधरी यांनी सदर चार आमदारांना अपात्र ठरविताना त्यांना माजी आमदाराचा दर्जाही नाकारल्याने सदर आमदारांना माजी आमदार म्हणून मिळणाऱ्या सर्व लाभांपासूनही वंचित राहावे लागणार आहे.राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत सदर चार आमदारांनी बंडखोर उमेदवार अनिल शर्मा आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते साबीर अली यांच्यासाठी काम करून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका या आमदारांवर ठेवण्यात आला आहे.

झारखंडमध्ये भाजप-एजेएसयू निवडणूकपूर्व आघाडी
नवी दिल्ली: झारखंड विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेबरोबर (एजेएसयू) निवडणूकपूर्व आघाडी केली. त्यानुसार राज्यातील ८१ जागांपैकी एजेएसयू आठ जागा लढविणार आहे. एजेएसयूचे प्रमुख सुदेश महातो यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर प्रदेश भाजपच्या शिफारशीनुसार ही आघाडी करण्यात आली. भाजपची समविचारी पक्षांशी चर्चा सुरू असून एजेएसयूबरोबर झालेली चर्चा यशस्वी झाली, असे भाजपचे सरचिटणीस भूिपदर यादव यांनी सांगितले.