नागरिकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दौरा

लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी जम्मूलगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भागांना भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी व हिंसाचाराच्या घटना घडत असताना त्यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

नरवणे यांचे दोन दिवसांच्या भेटीसाठी सोमवारी येथे आगमन झाले होते. काश्मीर खोऱ्यात नागरिकांवर दहशतवादी हल्ले वाढले असून तेथील जंगलांमध्ये पूंछ व राजौरी भागात दहशतवाद्यांच्या विरोधात मोहिमा सुरू आहेत. आतापर्यंत नऊ सैनिक या मोहिमांत हुतात्मा झाले आहेत. लष्करप्रमुख नरवणे यांनी सीमेवरील व्हाइट नाईट कोअरला भेट देऊन कमांडर्सशी प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली, अशी माहिती सार्वजनिक माहिती महासंचालनालयाच्या अतिरिक्त महासंचालकांनी दिली. आतापर्यंत विविध भागांत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अकरा जण ठार झाले आहेत. त्यात पाच स्थानिक पण राज्याबाहेरच्या कामगारांचा समावेश असून अल्पसंख्याक समुदायाच्या दोन शिक्षकांना तसेच एका औषध दुकानदारास ठार करण्यात आले होते.

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी रविवारी असे सांगितले होते की, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल. दहशतवादी व त्यांच्या सहानुभूतीदारांना शोधून काढले जाईल. मेंढर, सुरणकोट व थानामंडी भागात ११ ऑक्टोबर रोजी दहशतवादविरोधी मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. सुरणकोट येथे ११ ऑक्टोबरला पाच लष्करी जवान ठार झाले होते. गेल्या गुरुवारी मेंढर येथे चकमक झाली होती त्यात चार जवान ठार झाले होते. दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठीच्या मोहिमेचा आज दहावा दिवस होता. आतापर्यंत  आठ जणांना ताब्यात घेतले आहे.