टेस्ट टय़ूब बेबीच्या निर्मितीत मोलाचे संशोधन करणारे नोबेल विजेते वैज्ञानिक रॉबर्ट एडवर्ड्स (वय ८७) यांचे आज येथे झोपेतच निधन झाले. २०१० मध्ये त्यांना या संशोधनासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. जगातील पहिली टेस्ट टय़ूब बेबी लुईस ब्राऊनच्या जन्मास त्यांचे हे संशोधन कारणीभूत ठरले होते. ब्राऊनच्या जन्मानंतर ५० वर्षांनी सर एडवर्ड्स यांना नोबेल मिळाले. बाह्य़ पात्र फलनाची पद्धत शोधण्यात त्यांचा मोठा वाटा होता. १९७० च्या सुमारास डॉ. पॅट्रिक स्टेपेटो व एडवर्ड्स यांच्या बाह्य़पात्र फलन तंत्राचा बराच बोलबाला होता. १९७८ मध्ये पहिल्या टेस्ट टय़ूब बेबीचा जन्म झाला.  केंब्रिज येथील प्रयोगशाळेत स्टेपेटो व एडवर्डस यांनी बाह्य़पात्र फलनाचा प्रयोग यशस्वी केला . ‘ज्या दिवशी मी सूक्ष्मदर्शकातून पाहिले तेव्हा मला गमतीदार दृश्य दिसले, पेशींचे समूह त्यावेळी दिसत होते. मानवी ब्लास्टोसाईटस जणू माझ्याकडे बघत होत्या. त्यावेळी आपण ते करून दाखवले असे मला वाटले’, असे एडवर्ड्स यांनी त्या प्रयोगाविषयी म्हटले होते.