देशात केलेल्या व्यवहारांवरील कर चुकविल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने फिनलंडमधील मोबाईल कंपनी नोकिया दोन हजार कोटी रुपये दंड भरण्याची नोटीस बजावलीये. या नोटिसीविरोधात नोकियाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्याला तात्पुरती स्थगिती दिली.
२१ मार्च रोजी प्राप्तिकर विभागाने नोकियाला नोटीस पाठवून आठवड्याच्या आत दोन हजार कोटी रुपये जमा करण्याची मागणी केली. या मागणीला नोकियाने न्यायालयात आव्हान दिले. गेल्या शुक्रवारी न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने प्राप्तिकर विभागाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आणि तोपर्यंत या नोटिसीला तात्पुरती स्थगिती दिली, नोकियाच्या भारतातील प्रवक्त्याने ही माहिती दिली.
प्राप्तिकर विभागाकडून आम्हाला नोटीस मिळाली आहे. आम्ही भारतातील कायद्याचे काटेकोर पालन केले आहे. भारत आणि फिनलंडमधील सरकारमध्ये करांसंदर्भातील झालेल्या करारातील तरतुदींचेही आम्ही पालन केले असून, प्राप्तिकर विभागाच्या नोटिसीविरोधात आम्ही न्यायालयात लढणार असल्याचेही या प्रवक्त्याने स्पष्ट केले.